esakal | भोरमध्ये पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा 
sakal

बोलून बातमी शोधा

bhor water supply

नीरा देवघर धरणाच्या कालव्यातील पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबतची खात्री न करता भोर नगरपालिकेने कालव्यातील पाण्याचा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरू केला आहे.

भोरमध्ये पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा 

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) : नीरा देवघर धरणाच्या कालव्यातील पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबतची खात्री न करता भोर नगरपालिकेने कालव्यातील पाण्याचा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरू केला आहे.

भाटघर धरणावरून भोरला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन मोटारींपैकी एक मोटार नादुरुस्त झाली. त्यामुळे काही महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाण्याचा पुरवठा सुरू होता. त्यातच 4 ऑगस्टला मुसळधार पावसामुळे पाणी पुरवठा योजनेचे पाइपही वाहून गेले. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा अधिकच विस्कळित झाला आणि शहराला तीन- चार दिवस पाण्याविना राहावे लागले.

अखेर नगरपालिकेने धावपळ करून भोरेश्वर औद्योगिक वसाहतीमधून जाणाऱ्या नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी देण्यास सुरवात केली. आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे वीज व कालव्यावरील पाइपलाइनचे कामही अतितत्काळ झाले. परंतु, सुमारे 20 किलोमीटर अंतरावरून येत असलेल्या कालव्यातील पाणी हे पिण्यास योग्य असल्याची खात्री नगरपालिका प्रशासनाने केली नाही आणि 19 ऑगस्टपासून शहराला त्या पाण्याचा पुरवठा सुरू केला.

कालव्यात असलेली घाण व पाण्याचे स्वरूप पाहता नागरिकांनी हे पाणी फक्त वापरासाठीच उपयोगात आणले. गढूळ व निर्जंतुकीकरण न केलेल्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांना पोटाचे व साथीचे विकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अनेकांनी पिण्यासाठी मात्र बाटलीबंद पाणी वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे नगरपालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर येत आहे.

आम्ही पाण्याचे नमुने मंगळवारी (ता. 20) प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठविले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पाण्यात तुरटी व टीसीएलचा नियमितपणे वापर करीत असून, कालव्यातील पाण्याचे क्‍लोरिनद्वारे शुद्धीकरण करण्यासाठी तज्ज्ञांचे अभिप्राय घेण्यास सुरवात केली आहे. 
- डॉ. विजयकुमार थोरात, 
मुख्याधिकारी, भोर नगरपालिका 

भोर नगरपालिकेने नागरिकांसाठी कालव्यातून अतितत्काळ पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, हे पाणी खराब किंवा पिण्यास योग्य नाही, याबाबत कोणीही नगरपालिकेकडे विचारणा केलेली नाही किंवा तक्रारही केलेली नाही. जलशुद्धीकरण केंद्रात बदल करण्यासाठी नगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. 
- निर्मला आवारे, नगराध्यक्षा, भोर 
 

loading image
go to top