

इम्रान यांच्याबाबत आदेशाला आव्हान
पाकिस्तान सरकारचा निर्णय; फेरविचार याचिका दाखल करणार
इस्लामाबाद, ता. १९ (पीटीआय) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना खासगी रुग्णालयात हलविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला शाहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकार आव्हान देणार आहे. कायदामंत्री आझम नझीर तरार यांनी बुधवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खान यांना दोन दिवसांत इस्लामाबादमधील ‘शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल’मध्ये हलविण्याचे आणि त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांना भेटू देण्याचे आदेश सरकारला दिले होते. ‘‘हा आदेश कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही,’’ असे तरार यांनी व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या निकालाचे पुनरवलोकन केले असून न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार, दोषी कैद्यावर तुरुंगात किंवा सरकारी रुग्णालयात उपचार केले जाणे आवश्यक आहे, असे सांगून तरार यांनी या आदेशात सुधारणा करण्याची मागणी केली जाईल असे स्पष्ट केले. ७३ वर्षीय खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील तुरुंगात आहेत.
बहीण, पत्नीची भेट
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात नऊ महिन्यांनंतर आपली बहीण आणि पत्नीची भेट घेतली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खान यांच्या प्रकृतीबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर त्यांना आठवड्यातून एकदा कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली आहे. इम्रान यांची बहीण नोरिन नियाझी यांनी इम्रान यांची १५ मिनिटे भेट घेतली. तुरुंगातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची भेट तुरुंगातील कॉन्फरन्स रूममध्ये झाली. यावेळी त्यांनी खान यांची प्रकृती आणि इतर विषयांवर चर्चा केली. खान यांच्या इतर बहिणी अलिमा खान आणि उझमा खान तसेच चुलत भाऊ कासिम झमान यांना भेटीची परवानगी नाकारण्यात आली; तसेच त्यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही या भेटीपासून रोखण्यात आले.
पत्नीसोबत अर्धा तास भेट
इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनीही मंगळवारी रात्री तुरुंगातील कॉन्फरन्स रूममध्ये त्यांची भेट घेतली. ही भेट सुमारे ३० ते ३५ मिनिटे चालली. अडियाला तुरुंगातच असलेल्या बुशरा बीबी यांनी आपली मुले मुसा, मुबशरा मनेका आणि नणंद मेहरुन्निसा यांचीही ४० मिनिटे भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.