esakal | Pune : केशवनगर कुंभारवाड्यात देवीच्या मुर्तींना रंग देण्याची लगबग
sakal

बोलून बातमी शोधा

pune

केशवनगर कुंभारवाड्यात देवीच्या मुर्तींना रंग देण्याची लगबग

sakal_logo
By
कैलास गावडे

मुंढवा : केशवनगर येथील कुंभरवाड्यात मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सद्यस्थितीत साच्यातून तयार मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यावर तणस आणि मातीचा लेप चढवून मूर्तीला प्राथमिक रुप देण्यात कलावंत गुंतले आहेत. तर काही ठिकाणी मूर्तीसाठी मिश्रण तयार करण्यापासून ओतीव काम, साच्यातील मूर्तीला पॉलिश करण्याचे काम संपवून रंगरंगोटीच्या कामास सुरूवात झाली आहे.

शहरातील विविध भागात गुरूवार दि. ७ आक्टोबर रोजी घटस्थापना होणार असल्याने नवरात्रौत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे. आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचे पर्व म्हणून नवरात्रौत्सव सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्दीदात्री अशा देवीच्या नऊ मुळ रूपांची आराधना नऊ दिवस केली जाते. मात्र कोरोनामुळे अनेक बंधने यावर्षी देखील नवरात्र उत्सवासाठी आहेत. मूर्तीची उंची त्याचप्रमाणे उत्सव साजरा करण्यावर बंधने असल्याने मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनी देखील कमी उंचीच्या मुर्त्या घडवल्या आहेत. केवळ एक ते चार फुटांच्या मुर्त्या यावर्षी बनविण्यात आल्या आहेत.

नवरात्रोत्सवासाठी दुर्गेच्या विविध रूपी मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माँ शेरावाली, सिंहावर बसलेली आंबामाता, कलकत्याची कालिका, वणीची सप्तश्रृंगी माता, महिषासुरमर्दिनी, संतोषी माता, पंच सिहांच्या रथावर आरूढ झालेली देवी महालक्ष्मी, दुर्गादेवी, वाघावरील दुर्गादेवी, सप्तशृंगीदेवी, रेणुकादेवी, तुळजा भवानी अशा विविध प्रकारच्या देवी मूर्ती साकारल्या आहेत. त्या मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना त्यांच्या डोळ्यांतील तेजस्विता आणि रंगोटीतील आकर्षकता वाढविण्याचे काम जोमाने सुरू आहे. अशा दुर्गेच्या रूपानी कुंभारवाडा भरून गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून देवीच्या सिंहवाहिनी रूपासह मूर्तीतही नावीन्य आले आहे. तसेच बंगाली दुर्गामाता, कालिमाता, महिषासुरमर्दिनीसह अंबाबाईचे रुपही नवरात्रोत्सवात मूर्तीरूपात पूजनासाठी साकारण्यात आले असल्याची माहिती प्रज्ञा आर्टचे सुभाष वाकीकर यांनी सांगितले.

यावर्षी सर्वात जास्त मागणी ही आंबाबाई आणि सप्तश्रृंगी मातेच्या चार फुटांच्या मूर्त्यांना आहे. केशवनगर परिसरातील कुंभार वाडयात दुर्गामातेच्या एक ते चार फूट उंचीच्या मूर्ती तयार आहेत. सध्या कुंभार वाडयामध्ये मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. परंतु कच्चा माल महाग झाल्याने मूर्त्यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.

येथील सागर आर्ट, ओम चैतन्य आर्ट, श्री आर्ट, प्रज्ञा आर्ट, विजयआर्ट तसेच अन्य घरांमध्येही लहान देवीच्या मुर्ती बनविल्या आहेत. कुंभारवाड्यात सुमारे दोन हजार मुर्त्या बनविल्या तयार केल्या आहेत. त्यांना जिल्हा व राज्याबाहेरून खूप मागणी आहे. येथून सातारा सांगली तसेच गुजराथ व राजस्थानमध्ये मुर्ती पाठविल्या जातात. अशी माहिती सुभाष वाकीकर, विजय शिंदे, दत्तात्रय कुंभार यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.

loading image
go to top