किल्ले राजगडावरील सात प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण सोहळा उत्साहात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inauguration ceremony of seven entrances Fort Rajgad on maharashtra din  pune

किल्ले राजगडावरील सात प्रवेशद्वाराचे दुर्गार्पण सोहळा उत्साहात...

वेल्हे : स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड (ता. वेल्हे )येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने किल्ल्यावरील सात प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला .

छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वाधिक सहवास लाभलेल्या व स्वराज्याची पहिली सव्वीस वर्षे राजधानी असलेल्या किल्ले राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने ३० एप्रिल ते १ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शनिवार ता. ३० रोजी किल्ले राजगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या जीवन पटावर आधारित लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते तर किल्ले राजगडावर पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते .किल्ल्यावरील पद्मावती देवी मंदिर ,महादेव मंदिर ,बालेकिल्ल्यावर विद्युत रोषणाई केली होती.

रांगोळी व भगवे ध्वज लावून संपूर्ण किल्ला सजवला गेला होता छत्रपतींचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील दोन प्रवेशद्वार गुंजवणे कडून येणाऱ्या चोर मार्गावरील तीन प्रवेशद्वार तर संजीवनी माचीवरील व बालेकिल्ल्यावरील प्रत्येकी एक प्रवेशद्वार असे सात ठिकाणी फुलांची सजावट करून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून लोकसहभागातून सात सागवानी प्रवेशद्वार बसविण्यात आले होते .आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वराज्याचे महाद्वार दुर्गार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून हजारो शिवप्रेमी ,दुर्गप्रेमी यांनी राजगडावर हजेरी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण कार्यकर्ते ,ढोल-ताशांचा ,संबळ, डफ, तुतारीचा निनाद भंडाऱ्याची उधळण करत छत्रपतींच्या जयघोषाने संपूर्ण राजगड परिसर दुमदुमून गेला .

किल्ल्यावरील सदरे समोर शिवकालीन मर्दानी खेळ, श्री गुरुकृपा वारकरी विद्यार्थी सेवा ट्रस्ट वाढाणे येथील बाल वारकऱ्यांनी भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश खुटवड ,योगेश रेणुसे ,मकरंद शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे शेकडो दुर्ग सेवक उपस्थित होते. तर किल्ल्यावर वेल्हे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव शिंदे, होमगार्ड विक्रांत गायकवाड, प्रशांत भरम, पुरातत्त्व विभागाचे बापू साबळे विशाल पिलावरे ,आकाश पिलावरे ,आकाश कचरे, महसूल विभागाचे मंडलाधिकारी रतन कांबळे ,तलाठी रवी मनाळे, कोतवाल वैभव आल्हाट ,गणेश गुरव आदीसह दुर्गप्रेमी पर्यटक उपस्थित होते.