शेवटी अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्र आलेच; पुण्यात कोविड हॉस्पिटलचे उदघाटन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले.

पुणे  : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले.

दरम्यान, हॉस्पिटलच्या आवारात होणाऱ्या कार्यक्रमाला पवार, फडणवीस यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, दोन्ही शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख उपस्थित होते. 

पुण्यातील पहिल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला पवार यांच्यासह सर्वक्षीय नेते उपस्थितीत होते. मात्र, फडणवीस नसल्याने राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मात्र फडणवीस येणार असल्याचे निश्‍चित झाले. त्यानिमित्ताने पवार-फडवीस हे नेमका बोलणार? याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महापौर मोहोळ यांच्या महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी सेंटरची पाहणी केली. महापालिकेने "सीएसआर'तर्गंत उभारलेले हे पहिले हॉस्पिटल आहे. 
महापौर म्हणाले, "कोरोनाने जी काही परिस्थिती निर्माण केली; त्यावर बहुतांशी प्रमाणात मात केली आहे. यापुढेही आरोग्य यंत्रणा तेवढीच सक्षम असायला हवी, यादृष्टीने नवे उपाय करीत आहोत. त्याचाच भाग म्हणून स्वतंत्र हॉस्पिटल असेल. ज्यामध्ये गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आयसीयू आणि ऑक्‍सिजनची सुविधा मिळेल आणि मृत्यूदर आणखी कमी करण्यात यश येईल.'' 

बाणेर येथील महापालिकेच्या मालकीच्या पाच एकर जागेत हे हॉस्पिटल आहे. तुर्तास एक इमारत आहे. भविष्यात मात्र इमारतींची संख्या वाढवून, या हॉस्पिटलची क्षमता वाढवून किमान आठशे ते नऊशे रुग्णांना सामावून घेता येईल, अशा प्रकारे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of covid Hospital in Baner