संवेदनशील मन सुन्न करणारी ससून रुग्णालयातील घटना वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जुलै 2020

ससून रुग्णालयाच्या दारात रुग्ण आलेला. त्याला चालता  येत नव्हते. त्याचवेळी धो-धो पाऊस सुरू झाला. तेथे पोलिसांची गाडी आली आणि निघून गेली. रुग्णवाहिका आली अन रुग्णाला सोडून गेली..

पुणे - वार्धक्‍यामुळे चालता न येणारा रुग्ण ससून रुग्णालयाच्या दारात धो-धो पडणाऱ्या पावसात शुक्रवारी संध्याकाळी जमिनीवर भिजत पडलेला. पोलिसांची गाडी, रुग्णवाहिका ये-जा करताहेत. पण, कोणाचेच लक्ष नव्हते. रुग्ण वेदनेने विव्हळतोय. त्याला चक्कर येतीय, हात थरथर कापताहेत, उलट्या होतात, मळमळतंय. मात्र, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची "ड्यूटी' कोणाचीच नव्हती. ना तेथे काम करणाऱ्या कर्मचारी, ना सुरक्षारक्षकाची आणि डॉक्‍टरांची तर नाहीच नाही. कोणतेही संवेदनशील मन सुन्न करणारी घटना आज राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरविणाऱ्या पुण्यात घडली. 

ससून रुग्णालयाच्या दारात रुग्ण आलेला. त्याला चालता येत नव्हते. त्याचवेळी धो-धो पाऊस सुरू झाला. तेथे पोलिसांची गाडी आली आणि निघून गेली. रुग्णवाहिका आली अन रुग्णाला सोडून गेली. पण, जवळच असलेल्या रुग्णाकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. त्या वेळी तेथून जाणाऱ्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाकडे लक्ष गेले. डॉ. पवार यांनी त्याची चौकशी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

रुग्णाला चक्कर येत होती. त्यांचे हात थरथरत होते. मळमळ होत होती. पण, याकडे कोणाचे लक्ष नव्हते. रुग्णाला आत घेऊन जाण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला केले. "ड्यूटी नाही' असे सांगून तो पुढे निघून गेला. सुरक्षा रक्षकाची ड्यूटी प्रवेशद्वारावर होती. त्यामुळे त्याचीही मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत रुग्ण तेथे बराच वेळ पडून राहिला, असे डॉ. पवार यांनी सांगितले. 
सध्या रुग्णालयात कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. रुग्णालय रुग्णांनी पूर्ण भरले आहे, असे डॉ. पवार यांना येथील डॉक्‍टरांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या प्रकरणी "सकाळ'ने रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्या वेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. त्याची कोरोनाची चाचणीही करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incident at Sassoon Hospital in Pune