खडकवासला, किरकटवाडीत डेंगीच्या संसर्गात मोठी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

खडकवासला, किरकटवाडीत डेंगीच्या संसर्गात मोठी वाढ

किरकटवाडी - पावसाळा सुरू झाल्यापासून खडकवासला, (Khadakwasala) किरकटवाडी (Kirkitwadi) व नांदेड (Nanded) या गावांमध्ये डेंगीच्या रुग्णसंख्येत (Dengue Patient) मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे डेंगीच्या केवळ पाच ते सहा रुग्णांची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र खासगी दवाखान्यांमध्ये डेंगीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

खडकवासला, किरकटवाडी व नांदेड या गावांमध्ये थंडी, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रक्त तपासणीनंतर यातील बहुतांश रुग्णांमध्ये डेंगीचे निदान होत आहे. परिसरातील प्रत्येक खासगी दवाखान्यात चार ते पाच रुग्ण डेंगीवर उपचार घेत आहेत. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे मात्र याबाबत वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध नाही. प्रशासनाकडून खासगी दवाखान्यांना रुग्णांची माहिती कळविण्याचे निर्देश असताना खासगी दवाखान्यांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही.

हेही वाचा: पुणे : लोकल प्रवाशांचा हिरमोड; 'त्या' शिक्षकांमुळं मिळाले नाहीत पास

याबाबत खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्याशी संपर्क साधला असता, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या माध्यमातून डेंगीच्या रुग्णांचा सर्व्हे सुरू असून, ज्या परिसरात रुग्ण आढळून येत आहेत तेथे प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच खासगी दवाखान्यांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी...

  • कुंड्या, फ्रिज, कूलरमध्ये पाणी साठून राहू देऊ नका

  • घरातील सर्व भांडी पालथी ठेवून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळा

  • घराचा परिसर स्वच्छ ठेवा

  • टायर, मडके, पाइप यामध्ये पावसाचे पाणी साठू देऊ नका

  • मोठ्या टाक्या, डबके यामध्ये डासोत्पत्ती रोखणारे औषध टाका

  • ताप, थंडी, अंगदुखी किंवा शरीरावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करा.

  • भरपूर पाणी प्या.

(हा सल्ला डॉ. वंदना गवळी यांनी दिला आहे.)

हेही वाचा: राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचावे

नियमित धूर फवारणी आणि औषध फवारणी करणे आवश्यक आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास डेंगीचा मोठा विस्फोट होऊ शकतो. एका एका घरातील दोन ते तीन व्यक्ती डेंगीने आजारी आहेत. उपचारांचा खर्चही सर्वसामान्यांना न परवडणारा आहे.

- सौरभ मते, सरपंच खडकवासला

डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून प्रशासनाने ती नष्ट करावीत, तसेच याबाबत हलगर्जीपणा करणारे नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करावी. उपचार व प्रतिबंधात्मक उपायांबाबत महापालिकेने जनजागृती करणेही आवश्यक आहे.

- अतुल कारले, नांदेड

जशी तक्रार येईल त्याप्रमाणे व रुग्ण आढळून येतील तेथे धूर व औषधफवारणी करण्यात येत आहे. दोन सेवकांची त्यासाठी नेमणूक केली आहे. मनुष्यबळ कमी असल्याने सध्या अडचणी येत आहेत. नवीन गावांसाठी प्रत्येक गावात फवारणीसाठी कर्मचारी उपलब्ध झाल्यास वेग वाढेल.

- श्याम माने, औषध फवारणी विभाग, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Increase In Dengue Infection In Khadakwasla Kirkatwadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneKirkatwadiDengue