ऊस संशोधन संस्थांमध्ये गुंतवणूक वाढवावी - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

 साखर उद्योगाशी संबंधित ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक तुटपुंजी आहे. त्यामुळे भविष्यात मागणी असूनही साखर उद्योगाला साखरेसह वीज, इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन संस्था बळकट करणे आवश्‍यक असून, त्यासाठी गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

पुणे  - साखर उद्योगाशी संबंधित ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक तुटपुंजी आहे. त्यामुळे भविष्यात मागणी असूनही साखर उद्योगाला साखरेसह वीज, इथेनॉलचा पुरवठा करता येणार नाही. साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन संस्था बळकट करणे आवश्‍यक असून, त्यासाठी गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) संस्थेच्या वतीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित साखर उद्योगासंदर्भात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते आज झाले. इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह, पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘व्हीएसआय ही शेतकऱ्यांनी उभी केलेली देशातील एकमेव संस्था आहे. जगातील साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेउन साखर उद्योगाला पुढे नेण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ऊस शेतीमुळे ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बदल होत आहेत. साखर उद्योगाच्या वाढीसाठी संबंधित सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.’’ 

डॉ. ऑरिव्ह म्हणाले, ‘‘भारताने जागतिक साखर उद्योगाचे नेतृत्व स्वतःकडे आणले आहे. प्रक्रियेकडे वळणे आणि उत्पादकता वाढविणे हे पर्याय समोर आहेत. साखरेच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेत भारत ब्राझीलला मागे टाकून पहिल्या क्रमांकाचा देश होईल. भारताने इथेनॉल धोरण आणल्यामुळे साखर साठे कमी होत आहेत. तसेच, मळी आणि ऊस रसापासून इथेनॉल निर्मितीच्या वाढीला मदत होईल.’’

रंधवा म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य हे सहकार आणि साखर क्षेत्रात आमच्यासाठी आदर्श आहे. साखर उद्योगाने शेतकऱ्याला कायम केंद्रबिंदू ठेवावे. देशातील तरुणांना येथेच रोजगार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. 

या परिषदेला देश-विदेशांतील साखर उद्योजक, शास्त्रज्ञ, ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.

ऊस क्षेत्राऐवजी उत्पादकता वाढवावी
अन्नधान्याची गरज वाढत असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढविणे शक्‍य नाही. त्याऐवजी ऊस उत्पादकता वाढीवर भर द्यावा लागेल. बाजारातील चढ-उतार, वातावरणातील बदलामुळे दुष्काळ, क्षारता, ऊस पिकांवरील कीड- रोग आणि सिंचनाची आव्हाने पेलण्यासाठी उसाच्या नवीन प्रजातींचे संशोधन होण्याची गरज आहे. त्यासाठी जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान तसेच जनुक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase investment in sugarcane research institutes says Sharad Pawar