पुणेकर नियम पाळत नसल्यानेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar
पुणेकर नियम पाळत नसल्यानेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ - अजित पवार

पुणेकर नियम पाळत नसल्यानेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ - अजित पवार

पुणे - पुणे शहर (Pune City) व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण (Corona Patients) संख्या वाढत असली तरी फार चिंता करण्याची गरज नाही. रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. परंतु संसर्ग (Infection) वेगाने वाढत असल्याने पुणेकरांनी (Pune Citizens) कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे (Rules) काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.१५) पुणेकरांना केले आहे. पुणेकर नियम पाळत नसल्यानेच शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियम पाळा, अन्यथा आठवडाभरानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी कडक केले जातील, असा गंभीर इशारा पवार यांनी दिला आहे.

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्याच नियमावलीची सध्या पुणे शहर व जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. आणखी आठवडाभर सरकारचीच नियमावली लागू राहील. तुर्तास त्यात कोणताही बदल नाही. परंतु रुग्णवाढीचा आताचाच वेग कायम राहिल्यास, पुढील आठवड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणे जिल्ह्यातच होईल - अजित पवार

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी (ता. १५) पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही परिस्थितीत शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना लसीकरण वाढवा, शाळा-शाळांमध्ये १५ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करा, पुरेसा औषधसाठा, आवश्यक त्या सोयींनी युक्त रुग्णवाहिका, ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता करून आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने उपाययोजना गतीने करा.’’

पुणेकरांकडून पवारांच्या अपेक्षा काय?

 • नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे

 • गरज असेल तरच घराबाहेर पडावे

 • प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी

 • सामाजिक अंतराचे पालन करावे

 • मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा

 • रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे

 • लक्षणे दिसताच, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

कोरोना प्रतिबंधासाठीच्या संभाव्य उपाययोजना

 • गरज भासल्यास सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू करणार

 • पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड

 • हॉस्पिटल पुन्हा सुरु करणार

 • सार्वजनिक व राजकीय, खासगी कार्यक्रमांवर बंदी घालणार

 • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड करणार

 • रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड

 • राहिलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण करणार

 • शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची सोय करणार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top