पुण्यात ऑनलाइन शाळेऐवजी आता 'या' गोष्टीला वाढली हजेरी

मीनाक्षी गुरव
सोमवार, 29 जून 2020

-ऑनलाइन शाळेऐवजी ऑनलाइन क्लासेसला वाढली हजेरी
-ऑनलाइन क्लासेसच्या मागणीत वाढ
-क्लासेसची कोटयावधी रुपयांची होतीय उलाढाल

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सूरू आहे. यात आता ऑनलाईन शाळांबरोबरच ऑनलाईन खासगी क्लासेसची देखील भर पडली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन क्लासेसचा शोध वाढत असून या खासगी आणि व्यावसायिक शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरवर्षी शाळाबरोबरच खासगी शिकवणी वर्गांची सुरवात होते. तर काही शिकवणी वर्ग शाळा सुरू होण्यापूर्वीच सूरू होतात. मात्र यंदा खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी एप्रिल महिन्यापासुनच ऑनलाईन शिकवणी वर्गांची तयारी सूरू केल्याचे पाहायला मिळाले. नामांकित क्लासेसबरोबरच घरगुती शिकवणी वर्ग चालविणारे आता ऑनलाईन आले आहेत. त्यामुळे ऑनलाइनवर क्लासेस चालविणाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा रंगल्याचे दिसत आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई अशा अन्य मंडळाचे अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारे शिकविले जात आहेत. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत अन्य बोर्डच्या अभ्यासक्रमाची फी अधिक आहे. प्रत्येक बोर्डनुसार फीची रचना बदलत आहे. यापूर्वी घरगुती क्लासेस घेणारे देखील आता ऑनलाईन आले आहेत. क्लासेसच्या या फीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पालकांचे मात्र आर्थिक गणित जुळविताना कंबरडे मोडत आहे.

"माझ्या मुलाचे यंदा दहावीचे वर्ष आहे. शाळेमार्फत ऑनलाईन वर्ग दोन महिन्यापूर्वीच सूरू झाले आहेत. परंतु शाळेच्या वर्गात एका वेळी ४०-५० विद्यार्थी असतात. शिवाय अभ्यासक्रमातील काही संकल्पना नीट समजत नाहीत. प्रत्यक्ष शिकविण्यात आणि व्हर्च्युअल शिकण्यात बरीच तफावत आहे. प्रत्यक्ष शिकताना संकल्पना लवकर समजतात. ते ऑनलाईनद्वारे सहज शक्य होत नाही. मात्र ऑनलाईन खासगी व्यावसायिक क्लासेसमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या असते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी किमान काही शिकू शकत आहेत. अर्थात खासगी क्लासेसमुळे आमचा खिसा रिकामा होत आहे. - अंकुश पवार, पालक

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आम्ही एप्रिलपासूनच ऑनलाईन क्लास सूरू केला आहे. ऑनलाईन क्लास सूरू करण्याचा आमचा अनुभवही पहिलाच आहे. एका बॅचमध्ये १५ ते १६ विद्यार्थी संख्या आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्य होते. यासाठी आम्ही झुम अॅपचा वापर करत आहोत. - हेमा शिंदे, व्यावसायिक क्लास चालक

कोट्यावधी रूपयांची उलाढाल
- शहरातील ऑनलाइन खाजगी/व्यावसायिक क्लासेसची संख्या : जवळपास एक हजारपेक्षा जास्त
- घरगुती क्लासेस घेणारेही आले 'ऑनलाइन'
- क्लासची फी : ३,००० ते ९,००० रुपये (प्रत्येक विषय, प्रति महिना)
- संपूर्ण वर्षाची फी : ३० हजार ते एक लाख रूपयांच्या आसपास (तर काही ठिकाणी त्याहीपुढे)
- प्रत्येक बॅचमधील विद्यार्थी संख्या : १० ते २०
- झूम, वेबिनार अशा अॅपचा होतोय वापर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased attendance at online classes