हिंदुत्वाचा अपमान तुम्ही जेवढा केला तेवढा या देशात कोणीच केला नसेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदेंना 50 आमदारांना घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि राज ठाकरेंना देखील शिवसेनेतून बाहेर यावे लागले.

Chandrashekhar Bawankule : हिंदुत्वाचा अपमान तुम्ही जेवढा केला तेवढा या देशात कोणीच केला नसेल

इंदापूर - शंभर वेळा हिंदुत्व सोडलय आणि एक हजार उदाहरणे देता येतील कशाला तोंड उघडायला लावता, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जेव्हा हिंदुत्वाची चिरफाड करत होती तेव्हा ठाकरे शांत बसत होते. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच एकनाथ शिंदेंना 50 आमदारांना घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि राज ठाकरेंना देखील शिवसेनेतून बाहेर यावे लागले. त्यामुळे हिंदुत्वाचा अपमान तुम्ही जेवढा केला तेवढा या देशात कोणीच केला नसल्याची खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेवर केली.

इंदापूर येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व युवा वॉरियर्स यांच्या माध्यमातून युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक काटे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर, बारामती मतदार संघात एकच दिवशी 40 शाखाचे उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.यावेळी आ.गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, विक्रांत पाटील, गणेश भेगडे,दिपक काटे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या, मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो या काळात एक दिवस दाखवा की मी हिंदुत्व सोडलं आहे असं खुलं आव्हान भारतीय जनता पार्टीला दिले होते याचा समाचार घेतला.तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक करत राज्यात ज्या समाजाचे प्रतिनिधी विधिमंडळात नाहीत त्या समाजासाठीही भरघोस निधी देण्याचे काम फडणवीस यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले की अण्णा हजारे च्या आंदोलनात नाचून केजरीवाल मुख्यमंत्री झाले परंतु अद्याप यांना शंभरच्या पुढे आकडा नेता आला नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळेल तो भाग्यवान असेल कारण त्याच्यामागे बीजेपी ने ठाम उभे राहण्याचा तसेच संपूर्ण ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात अजबच कार्यक्रम चालू आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शहर विकासासाठी तेरा कोटी रुपये आम्ही आणले आणि विरोधक बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावतात याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रारच दिली पाहिजे अशी मागणी करत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली.

यावेळी गणेश भेगडे, दिपक काटे, मच्छिंद्र टिंगरे, शरद जामदार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बावनकुळे यांनी केले नियमांचे पालन

दरम्यान सदर सभेसाठी आयोजकाकडून 6 वाजताची वेळ देण्यात आली होती.मात्र रात्री 8:40 वाजता सभेस सुरवात झाली.याबाबत संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार बावनकुळे यांच्या मार्गात बदल झाल्याने विलंब झाल्याचे सांगण्यात आले.मात्र यामुळे कार्यकर्त्यांवर बराच वेळ ताटकळत बसण्याची वेळ आली.त्यानंतर सभेमध्ये इतर वक्त्यांनी खूप वेळ भाषण केल्यामुळे 9:56 ला बावनकुळे बोलण्यास उभे राहीले.परंतु 10 वाजता कार्यक्रम संपविणे बंधनकारक असल्याने फक्त 4 मिनिटात भाषण उरकते घेत येत्या तीन महिन्यात पुन्हा येऊन सविस्तर बोलणार असल्याची ग्वाही देत बावनकुळे यांनी नियमाचे पालन केले.