

इंदापूर, ता. १९ : विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या (एसआयआर) अंतिम टप्प्यात इंदापूर तालुक्यातील मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. तसेच प्राथमिक मतदार यादीतील दुबार नावे जैसे थे आहेत, असा दावा भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी केला आहे.
या प्रकारामुळे तालुक्यात मतदार यादीच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवडणूक आयोग आणि बीएलओच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गारटकर म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एका मतदाराचे मॅपिंग एकाच मतदान केंद्रावर होणे अपेक्षित आहे. मात्र, पिंपळे येथील मतदान केंद्र क्रमांक २० मध्ये ९० ते ९२ मतदारांची नावे दुबार मॅपिंग झाल्याचे आढळल्याचा दावा भाजपच्या वतीने नेमण्यात आलेल्या बीएलए यांनी केलेल्या पडताळणीमध्ये समोर आला आहे. संबंधित मतदारांची नावे पिंपळे गावाबरोबरच अन्य ठिकाणीही दिसत असल्याचे गारटकर यांनी सांगितले.
प्रशासनाने ही प्रक्रिया निष्पक्षपणे राबवून कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप होऊ न देता पात्र मतदारांची अचूक यादी तयार करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर योग्य दखल न घेतल्यास हा विषय मुख्यमंत्री स्तरावर मांडू, असाही इशारा गारटकर यांनी दिला.
यावेळी विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, आशुतोष गानबोटे, अतुल शेटे-पाटील, सतीश पांढरे, प्रदीप मत्रे, अक्षय शिंदे, अहमदराजा सय्यद, रूपेश सोनी यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मॅपिंग एकदाच होत असल्याचे सांगत तरीही शंका असतील तर वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी प्रतिक्रिया दिली.
इंदापूर शहरातील मतदार यादीत प्रशासनाच्या प्रक्रियेतून सुमारे ५ हजार ५०० संशयित अथवा अपात्र नावे कमी करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. मात्र, अद्यापही सुमारे एक ते दोन हजार संशयित मतदारांची नावे मतदार यादीत कायम असल्याचे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे जर बोगस नावे कमी केली नाहीत तर भविष्यात निवडणुकीमध्ये लोकशाही उद्ध्वस्त होईल, असे मत प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादी तपासून मयत, स्थलांतरित, दुबार अथवा संशयित मतदारांची नावे पडताळून पाहावीत. बोगस मतदानाबाबत शंका असलेल्या नागरिकांनी तात्काळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन गारटकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.