रासायनिक युद्ध थोपविण्यासाठी भारत सक्षम; डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drdo

रासायनिक स्वसंरक्षणात आपण जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचे डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune News : रासायनिक युद्ध थोपविण्यासाठी भारत सक्षम; डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

पुणे - रशिया-युक्रेन युद्धात डर्टी बॉम्ब पुन्हा एकदा चर्चेत आला असून, भारत भविष्यात रासानिक आणि जैविक युद्धासाठी सज्ज आहे का? असा प्रश्न एका पत्रकाराने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर, त्यांनी आपण पुर्णतः तयार असल्याचे सूचक विधान केले. विशेष म्हणजे रासायनिक स्वसंरक्षणात आपण जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रानंतर डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'रासायनिक आणि जैविक युद्धात स्वसंरक्षणासाठी आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान आपण विकसित केले आहे. विशेषतः रासायनिक शस्रांचा शोध घेणे आणि त्यापासून संरक्षण करण्याची प्रणाली विकसित करण्यात येत आहे.

दोन मोठ्या शहरांजवळ यासंबंधीच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळा संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहे.' भविष्यकालीन युद्ध सज्जतेबरोबरच डीआरडीओच्या नवीन प्रकल्पांची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. संरक्षण सामग्रीच्या तंत्रज्ञानासाठी देशातील संशोधन संस्था आणि उद्योगांसोबत परस्पर सहकार्य मोठ्या प्रमाणावर वाढविल्याचेही त्यांनी सांगितले.

ड्रोनच्या बाबतीत आघाडी -

जगातील इतर देशांच्या तुलनेत ड्रोन तंत्रज्ञानात भारताने आघाडी घेतली असून, वैद्यकीय सहायतेबरोबरच प्रत्यक्ष युद्धातील वापरासाठी ड्रोन सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यूक्लीअर गन ऑन ड्रोन आणि सुक्ष्म हत्त्यारांनी ड्रोन सज्ज झाले आहेत. देशातील संशोधन संस्था आणि उद्योगांसोबत परस्पर सहकार्य वाढविण्यात आले आहे.

स्टार्टअप्ससाठी निधी -

संरक्षण क्षेत्रात स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी डीआरडीओच्या वतीने विशेष योजना राबविण्यात येत असून, तंत्रज्ञान विकास निधीही देण्यात येत आहे. डीआरडीओच्या प्रयोगशाळांतील संसाधनांचा वापर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष चाचणीसाठी मदत पूरविण्यात येत आहे. डीआरडीओने भविष्यकालीन तंत्रज्ञानाची गरज निश्चित केली असून, त्यात कार्य करणाऱ्या स्टार्टअप्ससाठी हा निधी देण्यात येणार आहे.