वेदांशीच्या गाण्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vedangi Bhosale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणाऱ्या वेदांशी भोसले हिने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विक्रम नोंदविला.

India Book of Record : वेदांशीच्या गाण्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

पुणे - बालपणात चिऊ-काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणाऱ्या वेदांशी भोसले हिने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विक्रम नोंदविला आहे. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या तीन वर्षांची वेदांशी परदेशात राहूनही छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे खड्या आवाजात गाते.

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या आई-वडिलांसमवेत ती डेन्मार्क येथील ओडेन्स शहरात राहत आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात तीन मिनिटे ५८ सेकंदात तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा गायला. तिची आई प्रीती या गृहिणी आहेत, तर वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही दोन वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरती म्हणत आहे.

संतोष भोसले म्हणाले, ‘परदेशात वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न करत असतो.’ तर प्रीती भोसले म्हणाल्या,‘‘वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे आणि कथा ऐकवते. ती मन लावून सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. त्यातूनच ती भावगीते, पोवाडे गाते.’’