भारत-चीन परस्पर आदर आवश्यक

भारत-चीन परस्पर आदर आवश्यक
Published on

भारत-चीनने हितसंबंधांचा
आदर राखणे अत्यावश्यक

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन : डोवाल यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली, ता. २३ (पीटीआय) : भारत आणि चीन यांनी एकमेकांच्या ‘मूलभूत हितसंबंधां’चा आदर करत संवेदनशील मुद्द्यांचे वाटाघाटींद्वारे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे मत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या सहमतीच्या मुद्द्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘ब्रिक्स’ देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या वांग यांनी सोमवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. चीनच्या सरकारी ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत द्विपक्षीय संबंध, सीमावाद आणि संबंध सामान्य करण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी नसून भागीदार असल्याबाबत दोन्ही देशांच्या नेतृत्वांत एकमत असल्याचे वांग यांनी नमूद केले. हीच भारत-चीन संबंधांची सर्वात महत्त्वाची धोरणात्मक सहमती असून, त्यामुळे संबंधांच्या स्थिर आणि निरोगी विकासाला दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

वांग म्हणाले, की जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून भारत आणि चीन यांनी केवळ द्विपक्षीय नव्हे, तर जागतिक दृष्टिकोनातूनही सहकार्य वाढवले पाहिजे. दोन्ही देशांनी सहकार्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास आणि पुनरुज्जीवन साधावे तसेच ‘ग्लोबल साउथ’ प्रदेशाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेलाही चालना द्यावी.

सीमावादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, परस्पर हितसंबंधांचा आदर राखत संवेदनशील प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. त्याचा द्विपक्षीय संबंधांच्या एकूण वातावरणावर परिणाम होऊ देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय व्यापार, वित्त, कायदा अंमलबजावणी, प्रसारमाध्यमे आणि विविध क्षेत्रांतील संवाद व देवाणघेवाण वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. दोन्ही देशांनी जनतेमध्ये परस्पर समज आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘रचनात्मक चर्चा’
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी डोवाल-वांग यांच्यातील चर्चा ‘रचनात्मक आणि भविष्यवेधी’ असल्याचे सांगितले. स्थिर, अंदाज घेता येण्याजोगे आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंध परस्पर विश्वास आणि समज वाढविण्यास मदत करतात, यावर डोवाल यांनी भर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नवी दिल्लीत डोवाल आणि वांग यांनी सीमावरील शांतता व स्थैर्य कायम राखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर सहमती दर्शविली होती. सोमवारी झालेली बैठक ही त्याच प्रक्रियेतील पुढील महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com