भारताला इनोव्हेशन चॅलेंज फंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे. 

पुणे - इंग्लंड सरकारने भारतासाठी ४० लाख पौंडांचा इनोव्हेशन चॅलेंज फंड दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात इंग्लंड सरकारकडून याची घोषणा करण्यात आली. या निधीद्वारे उद्योन्मुख तंत्रज्ञानाला मदत केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांवर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्यासाठी उद्योग विश्व आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे दोन मुख्य तंत्रज्ञानविषयक केंद्रांवर लक्ष देण्यात येणार आहे. कर्नाटकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रातील भविष्यातील दळणवळणाची साधने यासाठी हा निधी मुख्यत: वापरण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानविषयक भागीदारीतील अनेक नव्या उपक्रमांपैकीच द इनोव्हेशन चॅलेंज फंड हासुद्धा एक उपक्रम आहे. उद्योन्मुख तंत्रज्ञानांच्या विकासासंबंधीच्या क्षमतेला वाव देत दोन्ही देशांमधील इनोव्हेशन, विकास आणि रोजगारासंबंधीच्या प्रश्नांना सहाय्य करण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी केलेल्या कराराचा हा एक भाग आहे. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच भागीदारी आहे. इनोव्हेशन चॅलेंज फंडाविषयीची अधिक महिती http://bit.ly/2TPKNFn या संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

‘‘मला यासंदर्भातील घोषणा करताना खूप आनंद होतो आहे. इंग्लंड आणि भारत डिजिटल तंत्रज्ञानाला विकसित करण्यात आणि त्याचा वापर करण्यात जगात आघाडीवर आहेत. दोन्ही देश एकमेकांकडून खूप काही शिकू शकतात आणि संयुक्तरीत्या काम करू शकतात,’’ असे मत या वेळी इंग्लंडचे भारतातील उपउच्चायुक्त जॅन थॉम्पसन यांनी व्यक्त केले.

आघाडीचे वैज्ञानिक, महाराष्ट्रातील वाहतूक उद्योगातील, व्यवसायातील आणि संशोधक क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. याशिवाय इंग्लंडमधील भविष्यातील दळणवळण व्यापारातील शिष्टमंडळही या वेळी  उपस्थित होते.

दोन्ही देशांमध्ये असलेल्या विविध क्षमतांचा आणि दृष्टिकोनांचा एकत्रितरीत्या वापर करून आपण जगातील एक सर्वोत्तम सकारात्मक ताकद बनू शकतो.  
केरन मॅकलस्की, इंग्लंड-भारत टेक भागीदारीचे प्रमुख.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Innovation Challenge Fund