भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार ऑक्टोबरअखेरीस लागू होण्याची शक्यता

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार ऑक्टोबरअखेरीस लागू होण्याची शक्यता
Published on

न्यूझीलंडबरोबरील ‘एफटीए’
ऑक्टोबरपासून लागू?

भारताची १०० टक्के निर्यात शुल्कमुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) ऑक्टोबरच्या उत्तरार्धात लागू होण्याची शक्यता आहे. कराराच्या अंमलबजावणीची नेमकी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मंगळवारी दिली.
वस्तू आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापार वाढविण्यास, तसेच गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडने २७ एप्रिल रोजी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारामुळे भारताच्या न्यूझीलंडला होणारी १०० टक्के निर्यात शुल्कमुक्त होणार आहे. हा करार ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागू होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कराराच्या अंमलबजावणीची नेमकी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. दोन्ही देशांना अंमलबजावणीची प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचा पूर्ण आढावा घ्यायचा आहे.’’ सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा करार १९ ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या न्यूझीलंडकडून सिरॅमिक्स, गालिचे, मोटारी आणि मोटारींचे सुटे भाग यांसारख्या प्रमुख भारतीय वस्तूंवर १० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाते. मुक्त व्यापार करारामुळे या वस्तूंच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.

चीनसोबत व्यापार संतुलनासाठी प्रयत्न
दिल्लीतील ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. दोन्ही देश व्यापारातील संरचनात्मक असमतोल, पुरवठा साखळीतील अडचणी आणि इतर संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना शोधत आहेत. व्यापारातील तूट कमी करून दोन्ही देशांमधील व्यापार अधिक संतुलित करण्यावर भर दिला जात आहे. व्यापारावर परिणाम करणाऱ्या विविध मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमधील बैठका यापुढेही सुरू राहतील, असे वाणिज्य सचिवांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com