

अनिश्चिततेच्या वातावरणातही भारताचा व्यापार स्थिर
आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांच्या व्यापारात ५.४ टक्क्यांनी वाढ
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ : वेगवेगळ्या देशांची व्यापार धोरणे, गुंतवणुकीचा ओघ आणि मालाची ने-आण करणारी साखळीमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण पडत असताना २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताचा व्यापार बऱ्यापैकी स्थिर राहिल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात भारताचा एकूण वस्तू आणि सेवांचा व्यापार ५.४ टक्क्यांनी वाढून १.८४ ट्रिलियन डॉलरवर (सुमारे १५३ लाख कोटी रुपये) पोहोचल्याचे नीती आयोगाच्या २०२५-२६च्या जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीच्या व्यापार आढावा अहवालात म्हटले आहे.
भारताची निर्यात ४.२ टक्क्यांनी, तर आयात ६.५ टक्क्यांनी वाढली, असे या अहवालात म्हटले आहे. जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीमध्ये वस्तूंची निर्यात २.८ टक्क्यांनी घटली, तर आयात ११.९ टक्क्यांनी वाढली. मात्र, सेवा क्षेत्राची निर्यात नऊ टक्क्यांनी वाढली. भारताकडून निर्यात होणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये हाँगकाँगने ५४ टक्क्यांच्या वाढीसह नवीन स्थान मिळवले. तर सोन्याच्या आयातीमुळे स्वित्झर्लंडमधून होणारी आयात ४८.१ टक्क्यांनी वाढली. भारत जगात सेवा निर्यात करणारा आठवा सर्वांत मोठा देश असून गेल्या दहा वर्षांत भारताच्या सेवा क्षेत्राचा वाढीचा १०.३ टक्के वेग जगाच्या सरासरी ६.६ टक्क्यांपेक्षा खूप जास्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
आशियाई देशांची निर्यात वाढली
- २०२५-२६ च्या शेवटच्या तिमाहीत भारताकडून निर्यात होणाऱ्या मुख्य वस्तूंमध्ये, तसेच आयात होणाऱ्या वस्तूंमध्येही बदल झाला नाही.
- फक्त विमाने आणि त्यांच्या भागांऐवजी खतांची आयात जास्त झाली.
- भारताची निर्यात प्रामुख्याने हाँगकाँग, सिंगापूर आणि चीन या आशियाई देशांमध्ये वाढली आहे.
- अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि ब्रिटन या पारंपरिक आणि मोठ्या बाजारपेठांमध्ये होणारी निर्यात थोडी कमी झाली आहे.
- भारताकडून निर्यात होणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये हाँगकाँगने ५४ टक्क्यांच्या वाढीसह नवीन स्थान मिळवले.
- सोन्याच्या आयातीमुळे स्वित्झर्लंडमधून होणारी आयात ४८.१ टक्क्यांनी वाढली.
सेवा निर्यातीचा टक्का वाढला
स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग या देशांमधून सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर मागवला गेला. गेल्या १० वर्षांत भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यातीने प्रतिवर्ष १०.३ टक्क्यांचा चक्रवाढ वृद्धी दर गाठला आहे. त्यामुळे २०२५ मध्ये जगाच्या एकूण सेवा निर्यातीत भारताचा वाटा ४.३ टक्के झाला आहे.
आयटी क्षेत्रात प्रगत देशच ग्राहक
भारताच्या सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रामध्ये अजूनही बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि ग्राहक सेवा व तांत्रिक मदतीचाच दबदबा आहे. २०२४-२५ मधील एकूण सॉफ्टवेअर निर्यातीत या क्षेत्राचा वाटा ६३.५ टक्के होता. प्रगत, श्रीमंत देश हेच भारताचे मुख्य ग्राहक असून, भारताच्या एकूण निर्यातीपैकी निम्म्याहून अधिक निर्यात एकट्या उत्तर अमेरिकेत होते, तर युरोपचा वाटा वाढून ३३ टक्के झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.