
भारत चीन युद्धातील वीरांची शौर्य गाथा...
तवांग : सायंकाळी साडेसहा वाजले होते... सर्वत्र धुक्याची हल्की चादर पसरली होती... समोर पांढऱ्या पडद्यावर ६० वर्षांपूर्वीचे दृश्य... चीन ने भारतावर केलेल्या हल्ल्यात भारतीय जवानांनी बजावलेली कामगिरी... हे सर्व पाहून डोळ्यात पाणी आणि अंगावर येणारे शहारे... अश्यात प्रत्येकाच्या मनात भारतीय सैन्याच्या प्रती असलेला विश्वास जणू अधिक दृढ झाला. असं काहीसे वातावरण गुरुवारी (ता. ९) तवांग युद्ध स्मारक परिसरात पाहायला मिळाले.
निमित्त होते तवांग युद्ध स्मारक येथे आयोजित 'लाईट अँड लेझर शो'चे. १९६२ मध्ये भारत आणि चीनच्या युद्धात अनेक जवानांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या युद्धातील हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ लष्कराच्या वतीने तवांग येथे तवांग युद्ध स्मारक उभारले आहे. तसेच युद्ध स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी येथे दररोज विशेष कार्यक्रम आयोजित केले जाते. शस्त्रास्त्रांची कमतरता असून ही मोठ्या संख्येने आलेल्या चीनी सैनिकांचा सामना करताना आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या जवानांबाबत नागरिकांना माहिती मिळावी, तसेच तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तवांगच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
युद्ध स्मारकाबाबत...
या युद्ध स्मारकावर स्तूप साकारण्यात आले असून हे १९६२ च्या युद्धातील सुमारे अडीच हजार हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आले आहे. स्मारकावरील समर्पण फलकावर हुतात्म्यांची नावे कोरण्यात आली आहेत. स्तूपाच्या सभोवताली अनेक ध्वज उंच फडकत आहेत. यामध्ये राष्ट्रध्वज, तिन्ही दलांचे ध्वज तसेच युद्धात लढलेल्या इतर २७ रेजिमेंटचे ध्वज आहेत. या स्मारकात बौद्ध वास्तू आणि त्यांच्या सांस्कृतिकची झलक पाहायला मिळते.
Web Title: Indian Army Heroes Indo China War Tawang War Memorial Heroic Saga Of Heroes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..