भारतीय संगीताचे भविष्य आश्वासक : डॉ. सत्यशील देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian  Music

भारतीय संगीताचे भविष्य आश्वासक : डॉ. सत्यशील देशपांडे

पुणे : ‘‘शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांनी आपापल्या गुरुजनांकडून पारंपारिक कलामूल्ये घेतली आहेत. मात्र त्यांचे हुबेहूब अनुकरण ते करत नाहीत. मिळालेल्या समृद्ध वारश्याला धक्का न लावता ते नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांच्याकडे बघून भारतीय संगीताचे भविष्य आश्वासक असल्याची खात्री वाटते’’, असे मत ज्येष्ठ गायक व संगीत समीक्षक डॉ. सत्यशील देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. तसेच ‘या तिन्ही गायकांनी फ्युजनसारखे प्रयोगही करावेत. मात्र त्यात इतरांचा वाण नाही, गुण घ्यावा’, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

डॉ. अंजली जोशी लिखित ‘जो भजे सूर को सदा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे या तीन गायकांचा सांगीतिक प्रवास उलगडणारे हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. याप्रसंगी शौनक अभिषेकी, आनंद भाटे, लेखिका डॉ. अंजली जोशी, कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक ऋतुपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘आपल्याकडे अभिजात शास्त्रीय संगीताची वैभवशाली परंपरा आहे. मात्र शालेय अभ्यासक्रमात त्याचे प्रतिबिंब उमटत नाही’, अशी खंतही यावेळी डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: उद्योजकांना मार्गदर्शनासाठी DES च्या वतीने उद्योजकता संशोधन केंद्र

आपल्या मनोगतात बोलताना शौनक अभिषेकी यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली. ‘‘नाट्यसंगीत, भावसंगीत, भक्तिसंगीत आणि शास्त्रीय संगीत अशा सर्व प्रांतात बाबांनी (पं. जितेंद्र अभिषेकी) मुशाफिरी केली. त्यांच्या कार्यावरील पुस्तक यापूर्वीच यायला हवे होते. मात्र त्यावरील काम सुरू असून पुढील सहा महिन्यात हे पुस्तक वाचकांच्या भेटीस येईल’’, असे त्यांनी सांगितले. आनंद भाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अवधूत पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Indian Music Future Dr Satyashil Deshpande

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsmusic
go to top