संवादायन

संवादायन
Published on

लोगोः संवादायन

डॉ. देवीप्रसाद भट्टाचार्य कथित आन्वीक्षिकी दर्शन

श्रीनिवास हेमाडे

इ. स. पूर्व चवथ्या शतकातील कौटिल्य लिखित ‘अर्थशास्त्र’ ग्रंथ विसाव्या शतकात उजेडात आल्यानंतर त्याची विविध स्पष्टीकरणे देण्यात येत आहेत. यातील ‘आन्वीक्षिकी विद्ये’ चे समकालीन व उपयोजित स्वरूपाचे तात्त्विक स्पष्टीकरण जागतिक दर्जाचे प्रख्यात भारतीय तत्त्ववेत्ते डॉ. देवीप्रसाद (बंगालीत देबीप्रसाद) चट्टोपाध्याय (१९१८-१९९३) यांनी त्यांच्या What is Living and What is Dead in Indian Philosophy या ग्रंथात केले आहे. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदान्त) ही वैदिक षड्दर्शने आणि बौद्ध, जैन व चार्वाक ही तीन अवैदिक, अशी नऊ दर्शने मिळून भारतीय दर्शनपरंपरा रचली जाते. तथापि त्यातील सांख्य, योग आणि लोकायत या तीन दर्शनांचा समावेश कौटिल्याने ‘विद्या’ (ज्ञान) म्हणून का केला? न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा (कर्मकांडे दर्शन)-उत्तरमीमांसा (वेदान्त) यांचा साधा उल्लेखही कौटिल्य का करीत नाही; शिवाय बौद्ध-जैन यांना तर कौटिल्य खिजगणतीतही का धरीत नाही, असे मौलिक व मूलभूत प्रश्न देवीप्रसाद उपस्थित करतात.

इहवादी दर्शने आणि बिगरइहवादी दर्शने
देवीप्रसादांच्या मते, कौटिल्याने भारतीय दर्शनपरंपरेची मांडणी ‘वैदिक-अवैदिक दर्शने’ अशी न करता ‘इहवादी दर्शने आणि बिगरइहवादी दर्शने’ अशी रचना केली. ती करताना कौटिल्य ‘त्रयी’ (ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद) मान्य करतात. त्रयी म्हणजे वेदातून व्यक्त होणारी वर्णव्यवस्था (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र), पुरुषार्थ व्यवस्था (धर्म, अर्थ, काम व मोक्ष) आणि आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास) यांनी बनलेले ‘वैदिक धर्मशास्त्र’. व्यावहारिक शास्त्र म्हणजे वार्त्ता (वाणिज्य, शेती व उद्योगधंदे) व दंडनीती (राज्याचे कायदे व न्याय मंडळ). पण यांचा समावेश न करता नऊ दर्शनांपैकी ‘आन्वीक्षिकी’त फक्त सांख्य, योग आणि लोकायत या तीन दर्शनांचा समावेश कौटिल्याने केला. देवीप्रसादांच्या मते याची तीन कारणे आहेत.
(१) सांख्यदर्शन निखळ निरीश्वरवादी अर्थात अवैदिक इहवादी दर्शन आहे.
(२) कौटिल्यास अपेक्षित असलेला ‘योग’ म्हणजे पतंजलीचे योगदर्शन नाही, तर त्या काळी (अंदाजे इ. स. पूर्व चवथे - पाचवे शतक) प्रचलित झालेले आणि आजही प्रचलित असलेले ‘न्याय-वैशेषिक दर्शन’ म्हणजे योग. ही दोन्ही दर्शने ‘इहवादी’ आहेत, आध्यात्मिक नाहीत. देवीप्रसादांचे हे मत संस्कृत व न्यायदर्शनाचे महान भारतीय विद्वान महामहोपाध्याय तर्कवागीश फणिभूषण (१८७५-१९४१) आणि महामहोपाध्याय विद्यावाचस्पती दर्शन-कलानिधी कुलपती एस. कुप्पुस्वामी शास्त्री (१८८०-१९४३) या दोन विद्वान अभ्यासकांच्या संशोधनावर आधारित आहे.

फणिभूषण यांच्या मते ‘योग म्हणजे विश्व रचना करणारा भौतिक अणूंचा संयोग’, आणि कुप्पुस्वामींच्या मते ‘योग म्हणजे मानवी विवेकशक्ती किंवा ‘तर्कशक्ति’. अणुवाद व तर्कवाद हा भौतिक इहवादी दृष्टीकोन आहे. तिचा आध्यात्माशी (म्हणजेच त्रयीरुप वैदिकतेशी) संबंध नाही. विश्वाची रचना भौतिक अणूंनी झाली आहे तर मानवी जीवनाची रचना विवेकशक्तीने केली आहे. दोन्हींचे ज्ञान केवळ ‘प्रत्यक्ष प्रमाणा’ ने आणि प्रत्यक्षावर आधारित ‘अनुमान प्रमाण - तर्काने - तर्कशक्तीने होते. अणुवादी वैशेषिक दर्शन आणि विवेकशक्तीवादी तर्क (न्याय दर्शन) यांच्या संयोगातून विश्वाचे व जीवनाचे यथार्थ ज्ञान मानवाला होते. म्हणून न्याय-वैशेषिक यांच्या तत्त्वज्ञानाला कौटिल्य यांनी ‘योग’ म्हटले आहे.

(३) तिसरे ‘लोकायत’चा (चार्वाक) समावेश करण्याचे कारण हे दर्शन मुळात इहवादीचं आहे. या दर्शनाने वैदिक दर्शनांसह बौद्ध व जैन दर्शन या दोन अवैदिक दर्शनांनाही प्रखर विरोध केला. लोकायत दर्शनाच्या मते ‘अर्थ व काम हेच दोन पुरुषार्थ सत्य’ आहेत. आणि ‘प्रत्यक्ष प्रमाण हेच एकमेव ज्ञानाचे प्रमाण’ असते. माणूस कितीही धार्मिक अथवा मोक्षवादी असल्याचा दावा करीत असला तरी त्याचे जीवन केवळ अर्थ व काम यांच्यावर आणि प्रत्यक्ष ज्ञानेन्द्रियांवर आधारलेले असते. जीवन कोणत्याही काळात सदैव निखळ भौतिक अर्थात इहवादी असते, ही लोकायत दर्शनाची भूमिका आहे.

जीवन प्रकाशमन करणारी विद्या
देवीप्रसाद यांच्या मते, “कौटिल्य यांनी ‘भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पनाच मुळात बदलून टाकली. भौतिक वास्तव, जग व जीवन यांच्याविषयीचा दृष्टिकोन नेहमीच शुद्ध तार्किक, बुद्धिप्रामाण्यवादी ठेवला पाहिजे, (आध्यात्मिक, ईश्वरवादी, किंवा परलोकवादी ठेवू नये) अशी स्पष्ट भूमिका कौटिल्य घेतात. ही त्यांची अनुभववादी, प्रयोगवादी वैज्ञानिक दृष्टी आहे; म्हणूनच कौटिल्य म्हणतात, “तर्कविद्या आणि तार्किकतायुक्त दर्शन उर्फ ‘आन्वीक्षिकी’ हीच एकमात्र सर्व विद्यांमध्ये जीवन प्रकाशमान करणारी, सर्व कार्य सिद्धीस नेणारी आणि सर्व धर्मांची आश्रयस्थान विद्या आहे” असे कौटिल्य म्हणतात.” (प्रदीपः सर्वविद्यानांमुपाय: सर्व कर्मणाम्,आश्रय: सर्व धर्माणां शश्वदान्वीक्षिकी मत, अर्थशास्त्र१.२.१२)

तत्कालीन राजकीय जीवनावर आन्वीक्षिकीचा खूप मोठा प्रभाव होता. रामायणाच्या उत्तरकांडात श्रीराम काही विद्वानांशी हेतुवाद (तर्कवाद) करताना आढळतो. राजा जनक या विद्येत कुशल होता आणि बलराम व श्रीकृष्ण दोघेही धनुर्वेद, राजनीतिशास्त्र आणि आन्वीक्षिकी विद्या जाणत होते, असेही स्पष्टपणे आढळते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या मते, रोमन कायदा जसा ख्रिस्ती धर्माचा भाग नव्हता, तसा कौटिल्यलिखित ‘अर्थशास्त्र’कालीन कायदा पारलौकिक वैदिक धर्मविचाराचा भाग नव्हता, ती स्वतंत्र भौतिक विचारसरणी होती. आन्वीक्षिकी हेच मुख्य भारतीय तत्त्वज्ञान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com