रुपया ५० पैशांनी घसरून ९६.७०च्या ऐतिहासिक नीचांकी

रुपया ५० पैशांनी घसरून ९६.७०च्या ऐतिहासिक नीचांकी
Published on

रुपया ५० पैशांनी घसरून ९६.७० च्या ऐतिहासिक नीचांकी

मुंबई, ता. १९ ः भारतीय रुपयातील घसरण सातत्याने सुरूच असून, आज सलग आठव्या सत्रातही रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५० पैशांनी खाली येत, ९६.७० या आपल्या आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी पातळीवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, सतत काढून घेतले जाणारे परकी भांडवल आणि जागतिक जोखीम-टाळण्याच्या वृत्तीमुळे बळकट झालेला डॉलर, या घटकांचा रुपयावर मोठा दबाव दिसून आला. आशियातील सर्वांत खराब कामगिरी करणारे चलन ठरलेल्या रुपयाने, सात मे रोजी नोंदवल्या गेलेल्या ९४.२२ या बंद पातळीपासून, गेल्या आठ सत्रांमध्ये डॉलरच्या तुलनेत २.४८ रुपये किंवा २.६४ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे हे रुपयातील तीव्र घसरणीची मुख्य कारणे असल्याचेपरकी चलन व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
आंतरबँक परकी चलन बाजारात, आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९६.३८ वर उघडला आणि दिवसभरात त्याने ९६.२७ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सत्राच्या अखेरीस, मात्र रुपया डॉलरच्या तुलनेत ९६.७० या आपल्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर स्थिरावला. ही त्याच्या मागील बंद पातळीपेक्षा ५० पैशांची तीव्र घसरण दर्शवते. सोमवारी, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९६.२० वर बंद झाला होता.

सध्या सुरू असलेला भू-राजकीय तणाव आणि परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेली शेअर विक्री या पार्श्वभूमीवर, डॉलरची मजबुती आणि अमेरिकी ट्रेझरी बाँड्सच्या वाढत्या परताव्यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेला हस्तक्षेप आणि सोने-चांदीच्या आयातीवर लादलेले काही निर्बंध, रुपयाला आधार देऊ शकतात. डॉलर-रुपयाचा स्पॉट भाव ९६ ते ९६.६० च्या दरम्यान राहील अशी अपेक्षा आहे, असे ‘मिराई ॲसेट शेअरखान’चे कमोडिटीज रिसर्च विभागाचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले

दरम्यान, सहा चलनांच्या समूहाच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा ‘डॉलर निर्देशांक’ ९९.२४ वर व्यवहार करत होता; इराणमधील वाढत्या तणावामुळे या निर्देशांकात ०.०५ टक्क्यांची वाढ दिसून आली. जागतिक तेल बाजाराचा प्रमुख मापदंड असलेल्या कच्च्या तेलाचे भाव वायदा बाजारात १.९२ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल १०९.९५ अमेरिकी डॉलरवर व्यवहार करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com