Suction Catheter Treatment : पुण्यात देशातील पहिली सक्शन कॅथेटर प्रोसिजर यशस्वी

सक्शन कॅथेटर वापरून हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीतील अडथळा काढण्यासाठी देशातील पहिली यशस्वी प्रक्रिया पुण्यात झाली.
Suction Catheter Treatment
Suction Catheter Treatmentsakal

पुणे - सक्शन कॅथेटर वापरून हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीतील अडथळा काढण्यासाठी देशातील पहिली यशस्वी प्रक्रिया पुण्यात झाली. हृदयरोगाच्या उपचारातील प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा असून, त्यामुळे ६२ वर्षीय रुग्णाला उपचार करण्यात आले. त्याला उपचारानंतर तिसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आल्याची माहिती सह्याद्रि रुग्णालयातर्फे शुक्रवारी कळविण्यात आली.

छातीमध्ये भयंकर वेदना आणि घामाने डबडबलेले शरीर अशा अवस्थेत रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. त्यांना हृदयाचा तीव्र झटका आल्याने तपासणीतून निदान झाले. हृदयाला रक्तपुरवठा धमनीमध्ये अडथळा आल्याने हा झटका आल्याचेही स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डेक्कनवरील सह्याद्रि रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे संचालक हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अभिजित पळशीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी प्रक्रिया करण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

'धमनील अडथळा काढण्यासाठी सक्शन कॅथेटरचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. याआधी पल्मनरी एम्बोलिजम, पेरिफेरल एम्बोलिजम आणि सेरेब्रल एम्बोलिजमवरील उपचारांसाठी या साधनाचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. पण सक्शन कॅथेटर हे कोरोनरी आर्टरीजसाठी डिझाईन करण्यात आले आहे कारण त्या नाजूक, मऊ व लवचिक असतात. सक्शन कॅथेटरमध्ये प्रगत सक्शन क्षमता आहे. रुग्णांना त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात मेटॅलिक स्टेंट्सचा वापर टाळता येतो,' असेही डॉ. पळशीकर यांनी स्पष्ट केले.

अशी केली प्रक्रिया

धमनीमध्ये अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक कॅथेटर पोहोचवला. एका स्पेशल व्हॅक्यूम पंप'च्या साहाय्याने सक्शन करून अडथळा काढण्यात आला. यामुळे हृदय स्नायूमधील रक्तप्रवाहामध्ये लक्षणीय सुधारणा झाली. ‘मायोकार्डियल ब्लश ग्रेड' (एमबीजी) मध्ये हे दर्शवण्यात आले.

नावीन्यपूर्ण पद्धतीने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून अडथळा प्रभावीपणे काढला. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका कमी झाला. कॅथेटर आत सरकवण्यापासून अडथळा काढून टाकण्यापर्यंतची प्रक्रिया फक्त १० मिनिटात पूर्ण झाली. भविष्यात अजून जास्त अडथळे निर्माण होऊ नयेत आणि उपचारांमधून जास्तीत जास्त अनुकूल परिणाम मिळावेत यासाठी रुग्णाला औषधे देखील देण्यात आली.

काय फरक पडला?

- या प्रक्रियेनंतर रुग्णाला छातीमधील वेदनांपासून आराम मिळाला.

- हृदयाला होणारा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत झाला

- हृदयाच्या कार्यात सुधारणा झाली

- रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारली

- इतर गुंतागुंतीचा धोका कमी झाला.

'रुग्णावर उपचार करताना ‘सक्शन सक्शन कॅथेटर'चा वापर करण्यात आला. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतील अडथळा काढण्यासाठी सक्शन कॅथेटर प्रथमच वापरण्यात आला. हृदय उपचारांमध्ये मिळवण्यात आलेले हे लक्षणीय यश आहे. मेकॅनिकल ऍस्पिरेशन वापरून धमनीमधील अडथळे काढून टाकण्याची क्षमता हा एक सुरक्षित व प्रभावी उपाय आहे, खासकरून जेव्हा अडथळे जास्त असतात अशा केसेसमध्ये हे खूप उपयोगी आहे.'

- डॉ. अभिजित पळशीकर, हृदयरोगतज्ज्ञ आणि संचालक सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

का येतो हृदयविकाराचा झटका?

ज्येष्ठ नागरिकांच्या धमनीमध्ये वर्षान् वर्षे हळूहळू जमा होत गेलेले कोलेस्टेरॉलमुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकाराचा झटका येतो. तरुणांच्या धमनीमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com