बारामतीच्या लॉकडाउनबाबत अधिकाऱ्यांनी दिलेत हे संकेत... 

मिलिंद संगई
Monday, 4 May 2020

बारामतीची बाजारपेठ लवकर सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यापाऱ्यांची आज पुन्हा एकदा निराशा झाली.

बारामती (पुणे) : येथील बाजारपेठ लवकर सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यापाऱ्यांची आज पुन्हा एकदा निराशा झाली. कोरोनाचे संकट पुन्हा उद्भवू नये, यासाठी जागरूक अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत नियमबाह्य फारसे काही होणार नाही, असे सांगत लवकर लॉकडाउनमधून सुटका होणार नाही, असे संकेत दिले. 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज (ता. 4) झालेल्या बैठकीस कांबळे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सुशील सोमाणी, रमणिक मोता, फखरुशेठ भोरी, जगदीश पंजाबी, चंद्रवदन मुंबईकर, संतोष टाटिया आदी उपस्थित होते. 

बारामतीत 12 मेपर्यंत जर कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही; तर बारामतीचा समावेश ऑरेंज झोनमध्ये होईल. त्यानंतर नियमानुसार जीवनावश्‍यक वस्तूंची सेवा वगळता प्रत्येक रस्त्यावरील इतर पाच दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, बारामतीचा विचार करता फक्त गुनवडी चौक ते गांधी चौक या एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूंची मिळून 100 दुकाने आहेत, या नियमानुसार प्रत्येक दुकानदाराला एक दिवस दुकान उघडे ठेवल्यावर पुढील 20 दिवस पुन्हा दुकान बंद ठेवावे लागेल, ही बाब व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या शिवाय कोणत्या पाच दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवायची, हे कोण ठरवणार, हाही त्यात कळीचा मुद्दा होता. 

अधिकाऱ्यांनी मात्र नियमावर बोट ठेवत त्या पलीकडे काही करता येणार नसल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात किमान दररोज चार तास का होईना सर्व दुकाने उघडी ठेवायची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. मात्र, कोरोनावर आता कुठे मात होत असल्याने एकदम अशी परवानगी देणे अवघड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

परिस्थिती पाहून बारामतीत टप्याटप्याने बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी देणे अपेक्षित आहे. पाच दुकाने उघडण्याचा नियम विचित्र आहे. यात अनेक अडचणी आहेत. परवानगी दिली; तर संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासच परवानगी द्यायला हवी. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मर्यादित कर्मचारी वर्गात प्रारंभी काम सुरू करणे, या सारख्या उपाययोजनांचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून याचा सहानुभूतीने विचार होणे गरजेचे आहे. 
- नरेंद्र गुजराथी
अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ, बारामती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the indication given by the authorities about the lockdown of Baramati