इंद्रायणीची स्वच्छता युद्धपातळीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्राची युद्ध पातळीवर स्वच्छता करण्यात येत आहे. वारीसाठी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली असून, स्वच्छ वारी-प्रदूषणमुक्त वारीचा संकल्प घेऊन हा सोहळा सुरळीत पार पाडणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी दिली. 

शहरातील घनकचरा प्रदूषण टाळण्यासाठी वारकऱ्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून स्वतंत्र बॅरेलमध्ये जमा करावा. नगरपालिकेची घंटागाडी कचरा गोळा करेल, अशा सूचना धर्मशाळा आणि राहुट्यांना दिल्या आहेत. तीर्थक्षेत्र विकास निधीतून उभारलेले सुमारे पाचशे सीटसची शौचालयेही वारकऱ्यांसाठी असणार आहेत. शौचालयांचे तुटलेले दरवाजे, नळ, विद्युतजोड नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरात चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार असून, पिंपरी महापालिकेच्या वतीने देहूफाटा परिसरासाठी यात्रा काळात दररोज दहा लाख लिटर पाणीपुरवठा पिण्यासाठी केला जाणार आहे. आळंदी गावठाणात पालिकेच्या वतीने दररोज चार सत्रांत पाणीपुरवठा होईल. राहुट्या आणि धर्मशाळांना पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र टॅंकरची व्यवस्था केली आहे. शहरातील विद्युत दिव्यांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदी, चऱ्होली रस्ता, वडगाव चौक या ठिकाणी प्रखर प्रकाश देणारे दिवे लावण्यात येत आहेत. पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांची लिलाव प्रक्रिया सुरू असून, व्यावसायिकांसाठी त्या देण्यात येणार आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानांचे अतिक्रमण, शेडबांधकाम दुकानदारांनी काढून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढली आहेत. जे काढणार नाहीत, त्यांचे अतिक्रमण दोन दिवसांत बंदोबस्तात हटविण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी भूमकर आणि नगराध्यक्ष उमरगेकर यांनी सांगितले.

जादा पाणी सोडण्याची मागणी
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील इंद्रायणीतील जलपर्णी युद्ध पातळीवर हटविण्याचे काम सुरू आहे. यात पोकलेन मशिन आणि ट्रॅक्‍टरच्या साह्याने जलपर्णी काढून नदीपात्र स्वच्छ केले जात आहे. वारीसाठी जादाचे पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे, असे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani River Cleaning