इंद्रायणी स्वच्छतेचा वसा घ्या - महेश लांडगे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

भोसरी - जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होणारच नाही, याची खबरदारी सर्वप्रथम नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा वसा नागरिकांनी घेतला पाहिजे,’’ असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत केले. 

भोसरी - जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होणारच नाही, याची खबरदारी सर्वप्रथम नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा वसा नागरिकांनी घेतला पाहिजे,’’ असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत केले. 

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील मैदानातून इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आणि जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रिव्हर सायक्‍लोथॉन वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार लांडगे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहायक आयुक्त दिलीप गावडे, खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, पूजा शेलार, कामगार नेते सचिन लांडगे, महापालिका उपायुक्त संतोष पाटील, प्रदीप वाल्हेकर, सचिन खोले, सचिन काळभोर, डॉ. नीलेश जोशी, दिगंबर जोशी आदींसह भोसरी विधानसभेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. या स्पर्धेत चार हजार सायकलपटूंनी सहभाग घेतला. दहा किलोमीटर, पंधरा किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटरची ही सायक्‍लोथॉन घेण्यात आली. पंधरा किलोमीटरची सायक्‍लोथॉन आमदार लांडगे, आयुक्त हर्डीकर, नगरसेवक सागर गवळी, विकास डोळस आदींसह इतरही नगरसेवकांनी पूर्ण केली.  महापालिकेच्या आरोग्य, क्रीडा विभाग, अग्निशमन दल, ॲडव्होकेट बार असोसिएशन्स, पिंपरी-चिंचवड निमा संघटना, डॉक्‍टर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशनसह शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सायक्‍लोथॉनमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेसाठी लागणाऱ्या सायकली युलू या संघटनेने पुरविल्या. इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृतीसाठी दहा हजार पुस्तिकांचे वाटप ॲवॉर्ड संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलद्वारे पुरविण्यात आल्या. ॲम्ब्युलन्स रुबी एलकेअर या संस्थेने उपलब्ध केल्या.  

या वेळी आयुक्त म्हणाले, ‘‘सध्या शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने वायू प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आणि स्वतःही तंदुरुस्त राहण्यासाठी नागरिकांनी सायकल चालविणे गरजेचे आहे.’’ ही सायक्‍लोथॉन अविरत श्रमदान, पिंपरी-चिंचवड महापालिका, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. भोसरी, दिघी मॅगझीन चौक, आळंदी, मोशी, भोसरी या मार्गाने ही सायक्‍लोथॉन घेण्यात आली. या मार्गावर विविध शाळेच्या दहा हजार विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मानवी साखळी तयार करून सायक्‍लोथॉनचे स्वागत केले. सायक्‍लोथॉन मार्गावर सातशे स्वयंसेवकांनी सहकार्य केले. चार डॉक्‍टरांच्या टीमसह चार ॲम्ब्युलन्सही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. सायक्‍लोथॉनचा शेवट भोसरीत करण्यात आला. महापौर जाधव यांनी सहभागी नागरिकांचे स्वागत केले. सहभागी नागरिकांना पदक आणि प्रशस्तिपत्रकही देण्यात आले. या ठिकाणी अल्पोपाहाराचीही सोय करण्यात आली होती.

Web Title: Indrayani River Cleaning River Cyclothon Mahesh Landage