‘इंद्रायणी’ अशुद्धच राहणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अशी आहे वस्तुस्थिती

  • हरित लवादाच्या आदेशानुसार चिखली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम पालिकेने थांबविले
  • चिखली व निळ्या पुररेषेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही
  • चिखली, एमआयडीसी परिसरातील सांडपाणी चऱ्होली प्रकल्पात नेण्याचे विचाराधीन आहे
  • चिखली ते चऱ्होली अंतर सुमारे १५ किलोमीटर लांब असल्याने खर्चिक आहे
  • पूररेषेबाहेर जागेचे बाजारमूल्य अधिक असल्याने कमी किमतीत जागा मिळणे अशक्‍य
  • नवीन जागा शोधावी लागणार; आरक्षण टाकून जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपान करावे लागेल

पिंपरी - इंद्रायणी नदीपात्रालगत उभारल्या जाणाऱ्या चिखली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार महापालिकेने थांबविले आहे. मात्र, सद्यःस्थितीत प्रकल्पासाठी पर्यायी जागाच उपलब्ध नसल्याने सांडपाणी थेट नदीतच मिसळणार आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या उत्तर सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रालगत चिखलीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले होते. त्यानुसार वर्षापूर्वी प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले होते. चिखली, रुपीनगर, त्रिवेणीनगर, तळवडे, साने चौक, कुदळवाडी, जाधववाडी, देहू-आळंदी रस्ता, मोशी, स्पाइन रस्ता, एमआयडीसी आदी भागातील सांडपाणी चिखली प्रकल्पात नेऊन प्रक्रिया करणे, अशी योजना होती. इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करणे असाही या मागील उद्देश होता. मात्र, नदीपात्रालगतच प्रकल्प असल्याने वारकरी, पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता. फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने जून २०१९ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रार केली. त्यानुसार मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली होती. तरीही काम सुरू राहिल्याने फेडरेशनने हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन २२ जून २०१९ रोजी सविस्तर अहवाल मागितला. 

सहा जुलैला स्थळपाहणी करून अहवाल पाठविण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. या वेळी प्रकल्पाची पायाभरणी व सीमाभिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले होते. ते पाडून अहवाल देण्याचा आदेश लवादाने दिला आहे.

प्रकल्प कशासाठी?
इंद्रायणी नदीत मिसळणाऱ्या चिखली व एमआयडीसी परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, नदीचे प्रदूषण रोखणे, यासाठी प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती. 

विरोध कशासाठी?
इंद्रायणीच्या पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार होते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार होता. नदीचे प्रदूषण वाढू शकते.

चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम थांबविले आहे. निळ्या पूररेषेबाहेरील जागांचे मूल्य अधिक आहे. नवीन जागा शोधून आरक्षण टाकावे लागेल. ते ताब्यात घ्यावे लागेल, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे.
- मकरंद निकम, सहशहर अभियंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani river Uncleaned