आळंदीत इंद्रायणी फेसाळली!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

इंद्रायणीचे रसायनयुक्त पाणी पाहून भाविकांनी तसेच आळंदीकरांनी नाराजी व्यक्त केली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, याचीच चर्चा आज दिवसभर झाली.
 

आळंदी - पिंपरी महापालिका हद्दीतून आज पहाटेपासून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने इंद्रायणी फेसाळली होती. नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आल्याने काही काळ काश्मिरसारखे दृश्य नदीपात्रात दिसून येत होते. मात्र इंद्रायणीचे रसायनयुक्त पाणी पाहून भाविकांनी तसेच आळंदीकरांनी नाराजी व्यक्त केली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे, याचीच चर्चा आज दिवसभर झाली.

आज पहाटेपासून इंद्रायणीत रसायनयुक्त पाण्याचा लोंढाच पिंपरी महापालिका हद्दीतून सोडण्यात आला होता. पहाटेपासून नदीपात्रात फेसाळल्याने सिद्धबेटपासून थेट मरकळपर्यंत पाण्यावर फेस दिसून येत होता. नागरिकांची फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. तर पालिका कर्मचारी शहराला पिण्याचे पाणी सोडण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक आलेल्या प्रदुषित पाण्यामुळे आळंदीतील पाणीपुरवठा विभागाची धांदल उडाली.मुख्याधिकारी समिर भूमकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के यांनी पाणी शुद्दीकरणासाठी क्लोरिनेशनचा डोस वाढवला. यामुळे पाण्याची शुद्दता नियंत्रित झाली आणि त्यानंतर शहराला पाणी वितरित केले.

मात्र रोजच अशाप्रकारे कसरत करावी लागत असल्याने पालिकेचे कर्मचारीही महापालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. दुसरीकडे आळंदीत स्नानासाठी इंद्रायणीत गेलेल्या भाविकांची फेसाळयुक्त पाण्यामुळे पंचायत झाली. अनेकांनी इंद्रायणीच्या कडेला वसूनच स्नान केले. मात्र बहुतांश भाविकांनी पाण्यामुळे त्वचेवर परिणाम होवू नये यासाठी प्रदुषित नदी पाहून भावनेला मुरड घातली. दुपारी चार वाजेपर्यंत इंद्रायणीची हीच अवस्था होती. मात्र चारनंतर पुन्हा इंद्रायणी पूर्ववत झाली. दरम्यान पिंपरी महापालिका हद्दीतून रोजच सांडपाणीयुक्त आणि रसायनयुक्त पाणी दरम्यान पिंपरी महापालिका हद्दीतून रोजच सांडपाणीयुक्त आणि रसायनयुक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी प्रदुषित होत आहे. याचे परिणाम आळंदीकर आणि भाविकांना सोसावे लागत आहे.यामुळे जोपर्यंत भामा आसखेडची योजना मंजूर होत नाही तोपर्यंत आळंदीला महापालिकेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. तर शासनाने महापालिकेवर कारवाई करावी, अशी मागणी आळंदीकरांतून होत आहे.

देशपातळीवर नद्या प्रदुषणमुक्त करून नदी संवर्धन करण्याचा आरडाओरडा करणाऱ्या भाजपाचीच सत्ता असलेल्या आणि श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पिंपरी महापालिकेकडून राज्यातील महत्वाचे तिर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणीत दररोज लाखो लिटरचे रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट सोडले जात असल्याने आळंदीकरांबरोबर आळंदीत येणाऱ्या लाखो भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदीत सतत मुख्यमंत्र्यांपासून अनेक छोटेमोठे मंत्री सातत्याने हजेरी लावतात. मात्र नदी प्रदुषणावर भाषणे ठोकण्याशिवाय ठोस कारवाई नसल्याने आळंदीकर आणि वारकऱ्यांचे हाल सुरू आहेत. पिंपरी महापालिकेने किमान आळंदीकरांच्या पिण्याच्या पाण्याची नैतिक जबाबदारी घ्यावी अन्यथा इंद्रायणीत सांडपाणी सोडणे बंद करावे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे.पिंपरी महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. नदी प्रदुषणमुक्तीचा डंका हाकणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारने स्वतःहून पिंपरी महापालिकेवर कारवाई करावी अशी मागणी आता आळंदीकर करू लागले आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indrayani river water has become chemically