

इंडसटिल : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे तंत्रज्ञान
..........
शेतीतील समस्या कोणत्या, अशी यादी तयार करायची झाली, तर ती ठिकाणपरत्वे वेगवेगळी आणि खूप मोठी होईल; पण दिवसेंदिवस कमी होत चाललेले मनुष्यबळ आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने यांत्रिकीकरणाला असलेली आर्थिक आणि तांत्रिक मर्यादा या समस्या सर्वत्र जाणवतात. त्या समस्येवर प्रभावी उपाय ठरेल असे तंत्रज्ञान पुण्यातील एका शेतकरीपुत्राने त्याच्या मित्रांसह विकसित केले आहे. आज त्या तंत्रज्ञानाचा विस्तार १० राज्यांपर्यंत झाला आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या स्टार्टअपची ही प्रेरणादायी कथा...
सातारा जिल्ह्यातील संदीप माने ऊस शेती करतात. त्यांनी शेतात ‘ऑटोफार्म’चा वापर सुरू केल्यानंतर त्यांचे कष्ट कमी होऊन पाणी व्यवस्थापन नियोजनबद्ध झाले आणि ऊस उत्पादनात तब्बल २५ टक्के वाढ नोंदविली गेली. ‘ऑटोफार्म’ म्हणजे मोबाइल फोनच्या माध्यमातून शेतातील सिंचन पंप, व्हॉल्व्ह आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करता येणारी स्वयंचलित यंत्रणा. सिंचन कधी सुरू करायचे, कोणत्या भागाला किती वेळ पाणी द्यायचे किंवा ठरावीक वेळापत्रकानुसार आपोआप सिंचन कसे करायचे, हे याद्वारे निश्चित करता येते. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे, वायरलेस आणि मॉड्युलर कंट्रोलर्स हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य. लहान शेतकऱ्याला परवडणाऱ्या स्वरूपात हे तंत्रज्ञान विकसित केले आहे पुण्यातील इंडसटिल फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने. त्या स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीलेश राजेंद्र मांडे.
वडिलांचे कष्ट पाहून सुचली कल्पना
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या श्रीलेश यांचे वडील पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओझर येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. श्रीलेश यांनीही लहानपणी वडिलांबरोबर शेतात काम केले आहे. तेव्हा श्रीलेश यांनी वडिलांचे कष्ट पाहिले. छोट्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना जवळून अनुभवता आल्या. मर्यादित साधने, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी आणि सिंचनासाठी वारंवार शेतावर जाण्याची गरज या रोजच्या अडचणी होत्या. अनेकदा गैरसोईच्या वेळी शेतावर जाऊन पंप सुरू-बंद करावा लागत असे, व्हॉल्व्ह चालवावे लागत. हे कष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी करता येतील का, या विचारातून या स्टार्टअपच्या कल्पनेने त्यांच्या मनात मूळ धरले.
‘इंडसटिल’ची सुरुवात २०१८ मध्ये झाली. ‘ट्रॅकटिल’ हा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट म्हणजे त्याचा पाया. प्रा. उमेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या संकल्पनेचा उद्देश छोट्या भारतीय शेतांसाठी परवडणारे आणि विविध कामांसाठी वापरता येईल असे फार्म युटिलिटी व्हेइकल विकसित करणे हा होता. याच प्रोजेक्टचे पुढे ‘इंडसटिल फार्मटेक’मध्ये रूपांतर झाले. ‘इंडस’ आणि ‘टिल’ (मशागत) या दोन शब्दांपासून ‘IndusTill’ हे नाव तयार झाले. सिंधू (इंडस) संस्कृतीतील कालीबंगन येथे प्राचीन काळी नांगरलेल्या शेताचे पुरावे पुरातत्त्व संशोधनात सापडले आहेत. शेती आणि अन्नधान्याच्या उत्तम उत्पादनाचा सिंधू संस्कृतीच्या समृद्धीत असलेल्या योगदानाचा हा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आजच्या शेतकऱ्याला समृद्ध करण्याची महत्त्वाकांक्षा यांची सांगड कंपनीच्या नावामध्ये घालण्यात आली आहे.
श्रीलेश मांडे, प्रा. उमेश यादव यांच्यासह शुभम परदेशी, सौरभ जाधव, बंडू नागलबोणे, निखिल मुतके, सनी परदेशी आणि अजिंक्य बोर्हाडे हे ‘इंडसटिल’चे आठ सहसंस्थापक आहेत. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील मैत्री, तसेच शेती आणि ग्रामीण भागाची समान पार्श्वभूमी यातून हे सगळे एका व्यापक उद्देशाने एकत्र आले. आज कंपनीच्या तीन उत्पादन विभागांतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येक सहसंस्थापक सांभाळतो.
तीन प्रमुख विभाग
‘इंडसटिल’चे तीन प्रमुख विभाग आहेत. सिंचन आणि फर्टिगेशन ऑटोमेशनसाठी ‘ऑटोफार्म’ यंत्रणा, उसाचा रस आणि संबंधित प्रक्रिया उपकरणांसाठी ‘गारवा’ मशिन आणि शेतातील विविध कामांसाठी परवडणाऱ्या फार्म युटिलिटी व्हेइकलची ‘ट्रॅकटिल’ लाइन. सध्या कंपनीचे मुख्य काम ‘ऑटोफार्म’वर आहे. या तिन्हींची सविस्तर माहिती घेऊया.
ऑटोफार्म
ऑटोफार्म ही भारतातील पहिली पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी, वायरलेस आणि मॉड्युलर सिंचन ऑटोमेशन व्यवस्था आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. याद्वारे मोबाइल अॅपच्या माध्यमातून पंप, व्हॉल्व्ह आणि संलग्न फर्टिगेशन उपकरणे शेतकऱ्याला नियंत्रित करता येतात. शेताचे वेगवेगळे सिंचन विभाग करता येतात. कोणत्या विभागाला कधी आणि किती वेळ पाणी द्यायचे याचे वेळापत्रक निश्चित करता येते. सिंचनासह खत देण्याचे व्यवस्थापनही करता येते. आवश्यकतेनुसार सेन्सर इनपुटचीही जोड देता येते. ‘ऑटोफार्म’चे कंट्रोलर्स पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्यांच्यासाठी शेतात कंट्रोल वायरिंग टाकणे, चर खोदणे किंवा स्वतंत्र बाह्य वीजपुरवठा देण्याची आवश्यकता नसते. केवळ सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या मुख्य पंपाला नेहमीचा वीजपुरवठा आवश्यक असतो.
याच्या वापरासाठी विशेष तांत्रिक प्रशिक्षणही आवश्यक नसते. स्मार्टफोन वापरण्याची प्राथमिक माहिती पुरेशी ठरते. इन्स्टॉलेशनच्या वेळी कंपनीची टीम सर्व यंत्रणा सेट करून पंप सुरू-बंद करणे, विभाग निवडणे, स्थिती पाहणे आणि वेळापत्रक ठरवणे अशा रोजच्या वापराच्या बाबी शेतकऱ्याला शिकवते. वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्याला सतत अॅप हाताळण्याची गरज राहत नाही. यामुळे पंप सुरू-बंद करण्यासाठी आणि व्हॉल्व्ह उघडण्यासाठी वा बंद करण्यासाठी वारंवार शेतावर जाण्याचे काम कमी होते. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे रात्री शेतात जावे लागणे किंवा वेळ चुकल्याने कमी-जास्त सिंचन होणे या बाबींवरही प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते.
पाणीबचत आणि उत्पादनवाढ
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०२५-२६मध्ये केलेल्या मूल्यमापनानुसार वेळेवर आधारित सिंचनामुळे १५ ते २२ टक्के पाणीबचत नोंदवण्यात आली. शेतकरी सर्वेक्षणावर आधारित निष्कर्षांमध्ये सरासरी २९.६२ टक्के पीक उत्पादनवाढ नोंदवली गेली. हे संबंधित मूल्यमापनातील शेतांवर दिसलेले परिणाम असून, प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार ते वेगवेगळे असू शकतात. नियंत्रित फर्टिगेशनमुळे पोषक घटक देण्यातही सातत्य राखता येऊ शकते; मात्र या अहवालात खतबचतीची निश्चित टक्केवारी दर्शवण्यात आलेली नाही. आजच्या घडीला १० राज्यांतील ८००हून अधिक शेतकऱ्यांनी ‘ऑटोफार्म’चा अंगीकार केला आहे. त्यात ऊस आणि फलोत्पादनासारखी सिंचनावर आधारित पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांचाही समावेश आहे.
ग्रामीण परिस्थितीचा विचार
एखादे तंत्रज्ञान केवळ खरेदीपुरते स्वस्त असून उपयोगाचे नाही. त्याची देखभालही परवडणारी असायला हवी, ही भूमिका ठेवून कंपनी काम करते. ‘ऑटोफार्म’च्या वायरलेस आणि मॉड्युलर डिझाइनमुळे शेतात वायरिंग आणि चर खणण्याचा खर्च टाळता येतो. खराब झाल्यास स्वतंत्र मॉड्युल बदलता येते. सिंचन कंट्रोलर्सना एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी दिली जाते. अनेक समस्यांचे प्राथमिक निदान फोन किंवा व्हिडिओद्वारे केले जाते. आवश्यक असल्यास कंपनीची फिल्ड टीम किंवा चॅनेल-सर्व्हिस पार्टनर सुटे भाग अथवा प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून देतात. कंपनीच्या सर्व यंत्रांमध्ये शक्य तिथे स्थानिक उत्पादने/निर्मिती, सहज सेवा देता येणारे घटक आणि ग्रामीण परिस्थितीला अनुरूप व्यावहारिक डिझाइनवर भर दिला जातो.
तीन राज्यांत अनुदानासाठी पात्र
‘ऑटोफार्म’ला मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये संबंधित योजनांतर्गत अनुदानासाठी पात्रता प्राप्त झाली आहे; मात्र अनुदानाची रक्कम, मॉडेल, शेतकऱ्याची पात्रता आणि अर्जाची पद्धत या बाबी संबंधित राज्याच्या योजनेनुसार बदलतात. त्यामुळे खरेदीपूर्वी आवश्यक पूर्वपरवानगी घेणे आणि त्या त्या वेळचे नियम तपासणे गरजेचे असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या नऊ राज्यांमध्ये कंपनीची विक्री टीम आहे. स्थानिक उपलब्धतेनुसार, ही यंत्रणा कार्यरत असलेल्या शेतांवर ‘ऑटोफार्म’चे प्रात्यक्षिकही पाहता येते. शेताची रचना, सिंचनाची गरज, इन्स्टॉलेशन आणि मिळू शकणार असलेले अनुदान याबाबत ही टीम मार्गदर्शन करते.
गारवा : उसाच्या मूल्यवर्धनाचे ‘कूल’ मॉडेल
उसाचा रस हे कायम मागणी असलेले ‘ऑल टाइम हिट’ पेय आहे. उसाचा रस काढणारी आधुनिक यंत्रणा इंडसटिलने ‘गारवा’ या आपल्या दुसऱ्या उत्पादन शाखेतून आणली आहे. ही उसाचा रस आणि संबंधित प्रक्रिया करणाऱ्या उपकरणांची श्रेणी आहे. याच्या साह्याने शेतकरी किंवा ग्रामीण उद्योजक उसावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना स्वच्छ पद्धतीने काढलेला ताजा रस विकू शकतात. रस्त्यालगतचे आउटलेट, बाजारपेठ, दुकान, फूड कोर्ट, हॉटेल किंवा रेस्टॉरंट अशा विविध ठिकाणच्या व्यवसायासाठी ‘गारवा’ वापर करून उत्पन्न मिळवता येऊ शकते. याच्या मॉडेलनुसार चिलिंग आणि इतर सोईंचाही समावेश करता येतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करून दररोजच्या उत्पन्नाची संधी निर्माण होऊ शकते.
‘गारवा’च्या साध्या मशिनची किंमत साधारण ५५ हजार रुपयांपासून सुरू होते. प्रीमियम, चिलर किंवा अधिक क्षमतेच्या मॉडेलची किंमत त्यातील सुविधांनुसार साधारण दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सुरुवातीलाच सर्वाधिक क्षमतेचे मॉडेल घेण्यापेक्षा अपेक्षित दैनंदिन ग्राहकसंख्येचा अंदाज घेऊन पाहून मशीन निवडावे, असा सल्ला कंपनी देते. मशिनव्यतिरिक्त स्टॉल किंवा गाडी, फूड-ग्रेड भांडी व साठवण, पाणी, फलक, कप किंवा सर्व्हिंग साहित्य, स्वच्छतेची साधने, आवश्यक स्थानिक परवाने, तसेच गरजेनुसार फ्रिज किंवा बर्फ-चिलिंगची व्यवस्था करावी लागते. साध्या सेटअपसाठी या पूरक खर्चाची व्याप्ती साधारण ५० हजार ते दीड लाख रुपये असू शकते. प्रीमियम आउटलेटमध्ये भाडे आणि इंटीरिअरनुसार खर्च अधिक होऊ शकतो. लहान आउटलेटचा विचार केला, तर ऊस, डिस्पोजेबल साहित्य, वीज किंवा बर्फ, स्वच्छतेचे साहित्य आणि स्थानिक वाहतूक असा मिळून दैनंदिन खर्च साधारण दोन हजार ते पाच हजार रुपये असू शकतो. यात सर्वाधिक आणि बदलता खर्च उसाचा असेल. (वेगळा कर्मचारी ठेवल्यास त्याचा खर्च वेगळा होईल.)
या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे छोटा विक्रेताही जागा, ग्राहकांची गर्दी आणि कामाच्या वेळेनुसार दररोज साधारण ३०० किलो ते एक टनापर्यंत ऊसप्रक्रिया करू शकतो. ही खूप मोठी उपलब्धी आहे.
ट्रॅकटिल : जिथून प्रवास सुरू झाला
इंडसटिलची मूळ संकल्पना असलेले ट्रॅकटिल हे लहान भारतीय शेतांसाठी विकसित केले जाणारे परवडणारे बहुउपयोगी फार्म युटिलिटी व्हेइकल आहे. पारंपरिक कृषी यांत्रिकीकरण अनेकदा महाग असते. शिवाय, लहान शेतांसाठी ते उपयोगी ठरत नाही. म्हणून ‘इंडसटिल’ शेतीच्या विविध कामांना मदत करणारे ‘ट्रॅकटिल’ हे एक बहुउपयोगी वाहन तयार करत आहे. ‘ट्रॅकटिल’साठी भारत, चीन, जपान, फिलिपिन्स आणि मलेशिया या देशांमध्ये पेटंट मिळाले आहे. सध्या ‘ट्रॅकटिल’चे अंतिम व्हॅलिडेशन आणि चाचणी सुरू असून, ते येत्या १२ ते १८ महिन्यांत बाजारात येऊ शकेल, असे श्रीलेश मांडे यांनी सांगितले. ‘ग्रासमास्टर’द्वारे शेतातील गवताचे व्यवस्थापन करता येते. तसेच वारंवार कराव्या लागणाऱ्या कामांचे श्रम कमी करणारी यंत्रेही कंपनीने विकसित केली आहेत. कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह आवश्यक काम वेळेत पूर्ण करणे, हा या सगळ्यामागचा उद्देश आहे.
सुरुवातीची आव्हाने
कृषिविषयक यंत्र तयार करणे आणि ते प्रत्यक्षात शेतात विश्वासार्हपणे चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘इंडसटिल’च्या सुरुवातीच्या काळात इंजिनीअरिंगमधील विश्वासार्हता, परवडणारी किंमत आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे ही तीन मोठी आव्हाने कंपनीसमोर होती. माती, चिखल, उष्णता आणि बदलत्या वीजपुरवठ्याच्या परिस्थितीत काम करणारी यंत्रे तयार करायची होती. त्याच वेळी त्यांची किंमत परवडणारी आणि सर्व्हिस सुलभ ठेवणे आवश्यक होते. विशेषतः ‘ऑटोफार्म’साठी प्रत्यक्ष शेतातील प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. ऑटोमेशन आपल्याच रोजच्या सिंचन पद्धतीमध्ये कसे बसू शकते, हे शेतकऱ्याला प्रत्यक्ष दाखवावे लागले. त्यासोबत उत्पादन, इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरच्या सेवेची व्यवस्थाही उभी करावी लागली, असे मांडे यांनी सांगितले.
या प्रवासात कंपनीला केंद्र सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कृषी मंत्रालय, एमएसएमई विभाग, इंडिग्राम लॅब्ज, फर्स्ट-आयआयटी कानपूर, स्पेक्ट्रम इम्पॅक्ट, अवध-आयआयटी रोपड आणि एफआयईडी-आयआयएम काशीपूर यांचे विविध टप्प्यांवर सहकार्य मिळाले. कोविड काळात ऑटोफार्म विकसित करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, तसेच आयआयटी कानपूरची मदत मिळाली, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
पुणेच का?
इंजिनिअरिंग क्षेत्रातील मनुष्यबळ, उत्पादनासाठी आवश्यक विक्रेते आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठा कृषी पट्टा हे तिन्ही घटक उपलब्ध असल्याने स्टार्टअपसाठी पुण्याची निवड करण्यात आली. पुण्याच्या परिसरात ऊस, फलोत्पादन आणि इतर उच्च मूल्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असल्यामुळे उत्पादनांची प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर सातत्याने चाचणी घेता आली. मजुरांची कमतरता आणि वाढलेली मजुरी, तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेले छोटे शेतीक्षेत्र, वारंवार करावे लागणारे सिंचन, पाणी आणि खतांचा अकार्यक्षम वापर आणि विश्वासार्ह सेवेसह परवडणाऱ्या यांत्रिकीकरणाची कमतरता या समस्या सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवून कंपनी आपले काम करत आहे.
देशाबाहेरही जाण्याची तयारी
कंपनीची उत्पादने आता ८००हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत आणि १० राज्यांमध्ये पोहोचली आहेत. आता प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, विश्वासार्ह इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरची सेवा जास्तीत जास्त छोट्या शेतकऱ्यांपर्यंत कंपनीचा भर पोहोचवण्यावर आहे. ‘मेड इन इंडिया’ असलेले ऑटोफार्म तंत्रज्ञान अन्य देशांमध्ये निर्यात करण्याची तयारीही कंपनी करत आहे. परवडणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने भारताला शेती क्षेत्रातील महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
शेतासाठी तंत्रज्ञान स्वीकारायला हवे; मात्र शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या मोहात पडण्याऐवजी आधी आपली समस्या ओळखावी, असा सल्ला श्रीलेश मांडे देतात. “सुरुवात आपल्या शेतातील खऱ्या समस्येपासून करा आणि ती विश्वासार्हपणे, परवडणाऱ्या खर्चात सोडवेल असे तंत्रज्ञान निवडा,” असे ते सांगतात. तंत्रज्ञान घेण्यापूर्वी ऑटोफार्म प्रत्यक्ष पाहा आणि आपल्या शेतासाठी ते अनुरूप आहे का, हे समजून घ्या, असेही ते सांगतात.
लहानपणी वडिलांबरोबर शेतात काम करताना आलेल्या अनुभवाचा संदर्भ देऊन ते आपल्या स्टार्टअपमागची भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, “तंत्रज्ञानामुळे छोट्या शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले पाहिजेत आणि त्यांच्या उपजीविकेचे साधन अधिक सक्षम झाले पाहिजे.”
“शेती हे क्षेत्र देशासाठी संरक्षण क्षेत्राएवढेच धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे बनेल, असा आम्हाला विश्वास आहे आणि छोट्या शेतकऱ्यांचे सबलीकरण हे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,” या वाक्यातून श्रीलेश मांडे यांची आणि कंपनीची भूमिका नेमकी स्पष्ट होते.
............
शेतकऱ्याचा अनुभव
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०२५-२६मध्ये केलेल्या ‘ऑटोफार्म’ मूल्यमापन अहवालात सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील ऊस उत्पादक संदीप माने यांचे उदाहरण नोंदविण्यात आले आहे. त्यांच्या शेतात डिसेंबर २०२२मध्ये ऑटोफार्म यंत्रणा बसवण्यात आली. चार प्लॉटमधील एकूण १२.५ एकर क्षेत्र ऑटोमेशनखाली आणण्यात आले. ऑटोमेशनपूर्वी ऊस उत्पादन एकरी ४० टन होते. ऑटोमेशननंतर ते एकरी ५० टन झाले. म्हणजेच २५ टक्के उत्पादनवाढ नोंदविण्यात आली. प्रणालीच्या कामगिरीबाबतही त्यांनी उत्तम रेटिंग दिले.
........
फोटो
०१ - श्रीलेश राजेंद्र मांडे PNE26W56691
०२ – विजापूर (कर्नाटक) येथे संजय पाटील यांच्या शेतात ऑटोफार्म यंत्रणा बसविताना. PNE26W56693
०३ – तिसगाव, (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथे राहुल भालेराव यांच्या शेतातील ऑटोफार्म यंत्रणा. PNE26W56694
०४ – अनंतपूर, आंध्र प्रदेश येथे शेतकऱ्याने बसविलेली ऑटोफार्म यंत्रणा. PNE26W56696
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.