
पुणे - पुणे-पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी पाठोपाठ आता हवेली तालुक्यातील उद्योगांनाही परवानगी न देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. दरम्यान, सोमवारी पहिल्याच दिवशी परवानगीसाठी उद्योग विभागाच्या वेबपोर्टलवर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होऊ लागल्याने वेब पोर्टलला देखील अडचणी येऊ लागल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. तो तीन मेपर्यंत राहणार आहे. परंतु, कोरोना बाधितांची संख्या कमी असलेल्या क्षेत्रातील उद्योगांना वीस एप्रिलपासून परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी वगळता काही भागातील उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल तयार केले. त्या माध्यमातून ही परवानगी देण्यात येणार असल्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक एस. एस. सुरवसे यांनी सांगितले होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी उद्योग विभागाचे सचिव यांनी एक बैठक घेतली. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडीसह हवेली तालुक्यातील उद्योगांना देखील परवानगी देण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या. हवेली तालुक्यातील अनेक भागात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच परवानगी देताना ज्या ठिकाणी कंपनी आहे, त्याच ठिकाणी राहणारे कामगार आहेत, अथवा कंपनीच्या कॉलनी, गेस्ट हाऊसमध्येच कामगार रहात आहेत. अशा अर्जांची छाननी करून मगच परवानगी देण्यात येणार आहे. अन्य शहरातून अथवा ठिकाणाहून कामगारांची ने-आण करावी लागणार आहे, अशा कोणत्याही कंपन्यांना परवानगी दिली जाणार नाही. कामाच्या ठिकाणी देखील पुरेशी काळजी घेऊन आणि सामासिक अंतर ठेवून काम करण्याचे बंधन राहणार आहे, असे सुरवसे यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी वैतागले
जिल्हा उद्योग केंद्राकडून उद्योगांना परवानगी देण्यासाठी Permission.midcindia.org हे वेब पोर्टल सोमवारी दुपारपासून सुरू करण्यात आले. आज पहिल्या दिवशी या पोर्टलवर परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येऊ लागल्याने त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. तर पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि हवेली तालुक्यात परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर करूनही देखील तेथील उद्योगांकडून विनाकारण चौकशीसाठी दूरध्वनी येत असल्याने तेथील कर्मचारी वैतागून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.