

प्रेमाच्या जाळ्यात ओढून
तरुणींवर अत्याचार
‘इन्फ्लुएन्सर’ला अटक; ८० जणींना फसवल्याचा दावा
नालासोपारा (जि. पालघर), ता. १३ : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी जिम प्रशिक्षक आरिफ शेख (वय २२) याला अटक केली. लग्नाचे प्रलोभन दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार एका २३ वर्षीय तरुणीने केली आहे. आरोपीने अनेक तरुणींना फसवून त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप तिने केला आहे. आतापर्यंत ७० ते ८० तरुणींची फसविल्याचा दावाही तिने केला आहे.
पीडित तरुणीची मागीलवर्षी आरिफ शेख याच्याशी ओळख झाली होती. आरिफ हा इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असून, जिम प्रशिक्षक म्हणूनही काम करतो. तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीला स्वतःसोबत राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात आरिफ आणि त्याच्या आईने तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तसेच तिला मारहाण केल्याचाही आरोप आहे. आरोपीचा मावसभाऊ सोहेल यानेही तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरिफ शेख, त्याची आई रुक्साना आणि मावसभाऊ साहिल शेख यांच्याविरोधात बलात्कार, बळजबरीने डांबून ठेवणे आणि मारहाण आदी आरोपांखाली सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ
पीडितेला आरिफच्या मोबाइलमध्ये अनेक तरुणींसोबतचे वादग्रस्त व्हिडिओ आढळल्याचा दावा तिने केला आहे. यानंतर तिने स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. आरोपी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींना लक्ष्य करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे आणि त्यानंतर त्यांच्या अश्लील चित्रफिती अश्लील संकेतस्थळांवर विकत असे, असा आरोपही केला आहे. दरम्यान, व्हिडिओच्या आधारे सकल हिंदू संघटनेचे शिव उपाध्याय यांच्या तक्रारीवरून रविवारी आरिफविरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.