#KnowYourCriminals एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्‍लिकवर 

दिलीप कुऱ्हाडे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

येरवडा - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिस्ट्री शिटरची (अट्टल गुन्हेगार) कुंडली मिळणार आहे. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, फोटो, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांकासह पत्ते गुगल मॅपद्वारे एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या लिंकच्या माध्यमातून पोलिस गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम येरवडा पोलिस ठाण्यात असताना त्यांनी येथील पंचवीस अट्टल गुन्हेगारांची घरे गुगल मॅपच्या माध्यमातून लिंक तयार केली होती. यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानमधील तज्ज्ञ रियाज नदाफ व दीपेन कदम यांची तांत्रिक बाजूसाठी मदत झाली. या लिंकच्या माध्यमातून ते सहज कोणत्याही गुन्हेगाराच्या घरापर्यंत पोचून त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवत होते. येरवड्यातील यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तब्बल एक हजार गुन्हेगारांना गुगल मॅपवर आणून ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांना गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवता येणार आहे.

या संदर्भात कदम म्हणाले, पूर्वी निवडणुका, सण, उत्सव काळात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हेगारांना ताब्यात घ्यावे लागत होते. त्यासाठी कोंबिंग ऑपरेशन अर्थात परिसर पिंजून काढून गुन्हेगारांना ताब्यात घ्यावे लागत होते. त्यामुळे श्रम व वेळ वाया जात होता. त्यासाठी गुन्हेगारांचा ठाव -ठिकाणा नवीन येणाऱ्या पोलिसांना सहज मिळेल यासाठी ‘नो यूवर क्रिमिनल्स’ या ॲपची कल्पना सुचली.’’

कालापव्यय होणार नाही
नवीन आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना हद्दीतील गुन्हेगारांपर्यंत पोचण्यासाठी बराच कालावधी लागत होता. पोलिसांना त्यांच्या हद्दीतील तसेच आजूबाजूच्या पोलिस ठाण्यातील गुन्हेगारांची माहिती होण्यासाठी ही लिंक उपयोगी पडणार आहे, असेही कदम यांनी सांगितले.

पुणे शहरातील यशस्वी प्रयोगानंतर पोलिस महासंचालकांची परवानगी मिळाल्यानंतर राज्यातील सर्व गुन्हेगारांना एका लिंकवर आणून ठेवता येईल. या माध्यमातून संबंधित पोलिसांना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे शक्‍य होणार आहे.
- अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे

Web Title: Information about one thousand criminals in Pune city and Pimpri-Chinchwad is available on online