'पीएमपी'ची हवी असलेली माहिती आता एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

बसमध्ये डिझेल किती शिल्लक आहे...शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोणत्या आगारात कोणत्या स्पेअर पार्टसची गरज आहे, ड्रायव्हर-कंडक्टरला कोणत्या रूटवर व कोणत्या बसमध्ये ड्यूटी आहे आदी विविध प्रकारची माहिती पीएमपी प्रशासनाला एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.

पुणे ः बसमध्ये डिझेल किती शिल्लक आहे...शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोणत्या आगारात कोणत्या स्पेअर पार्टसची गरज आहे, ड्रायव्हर-कंडक्टरला कोणत्या रूटवर व कोणत्या बसमध्ये ड्यूटी आहे आदी विविध प्रकारची माहिती पीएमपी प्रशासनाला एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पीएमपीमधील लिकेज काही प्रमाणात थांबणार आहे अन प्रशासनाचीही कार्यक्षमता उंचावू शकते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमपीच्या बसगाड्यांना हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे अनेक वर्षांपासून डिझेल पुरविले जाते. त्यांचे अधिकारी आणि पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्या चर्चेदरम्यान पीएमपीच्या दैनंदिन कामकाजासाठी मॉड्यूल्स पुरविण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यानुसार त्यांनी कार्गो एफएल या स्टार्टअपमार्फत दैनंदिन कामासाठीची चार मॉड्यूल तयार करून दिली आहेत. त्याचे हस्तांतर कंपनीने नुकतेच पीएमपीला केले. संगणक प्रणालीमार्फत पीएमपी प्रशासनाने त्यांचा वापर टप्प्याटप्याने सुरू केला आहे, अशी माहिती पीएमपीचे चीफ इंर्टनल ऑडिटर जे. एम. रॉड्रिक्स यांनी दिली. विशेष म्हणजे एचपीसीएलने ही मॉड्यूल्स पीएमपीला मोफत दिली आहेत, असेहीत्यांनी सांगितले.  

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

- अशी आहेत मॉड्यूल्स  

1- स्पेअर पार्ट मॅनेजमेंट सिस्टीम - पीएमपीच्या 13 आगारांत किती स्पेअर पार्टस 
आहेत, याची माहिती क्षणार्धात मिळणार आहे. त्यानुसार एखाद्या आगारात ते पार्टस हवे असतील तेथे उपलब्ध करून दिले जातील. तसेच पीएमपीकडे येणाऱया आणि वापरल्या जाणाऱया सर्व सुट्या भागांची नोंद संगणकीय व्यवस्थेत केली जाईल. त्यामुळे कोणता सुटा भाग कोणत्या बसला केव्हा वापरण्यात आला, याची अचूक नोंद होणार आहे. काही स्पेअर पार्टस संपले तर, तत्पूर्वीच त्यांची ऑर्डर संबंधित उत्पादकाकडे जाणार आहे. यामुळे सुट्या भागांची चणचण दूर होण्यास पीएमपीला मदत होणार आहे.

2- लॉगशीट - कंड़क्टर- ड्रायव्हर कामावर आल्यावर त्यांना कोणत्या मार्गावर जायचे आहे, याची माहिती घ्यावी लागते. त्यानंतर आपले जोडीदार कोण आहेत, हे त्यांना समजते. त्यानंतर बस कोठे उभी केली आहे, हे शोधून त्यांना ड्यूटी सुरू करावी लागते. आता ही सगळी व्यवस्था संगणकीकृत असेल. त्यांना इंर्टनल वापराच्या अॅपवरून ही माहिती मिळेल. त्यामुळे प्रशासकीय कामात जाणारा त्यांचा वेळ वाचून ते मार्गावर लवकर रवाना होऊ शकतील.

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

3- डिझेल मॅनेजमेंट - पीएमपीच्या कोणत्या बसमध्ये किती डिझेल शिल्लक आहे, हे समजणारी प्रभावी यंत्रणा सध्या नाही. त्यासाठी आता यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना डिझेलची किती गरज आहे आणि तसेच अन्य बसला किती डिझेल लागेल, त्याचा स्टॉक किती आहे, ही माहितीही
प्रशासनाला लगेचच समजणार आहे. त्यामुळे डिझेलचे वितरण सुलभ होणार असून त्याचा परिणाम बसच्या वाहतुकीवर होईल.

4- कर्मचाऱयांची माहिती - पीएमपीमध्ये सध्या कायम, कंत्राटी आणि बदली कामगार आदी सुमारे 11 हजार कामगार आहेत. त्यातील पीएमपीच्या कर्मचाऱयांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्यात त्याचा सेवेचा कालावधी, सेवेला सुरवात कधी केली, कोणकोणती कामे त्याने केली आहे, आदींचा तपशील असेल. वेतन, रजा, सुट्या या माहितीचाही त्यात समावेश असेल.  

पीएमपीची बससंख्या, कामगार, वाहतूक आदीचा व्याप मोठा आहे. त्याच्या दैनंदिन कामकाजासाठी ही मॉड्यूल्स उपयुक्त ठरणार आहेत. त्यासाठी एचपीसीएलच्या सर्व अधिकाऱयांचे पीएमपीतर्फे मी आभार मानते- नयना गुंडे (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The information required by PMP is now a click away