राज्य सरकारने पुण्यातील कोरोनाबाबत हायकोर्टात दिलेली माहिती चुकीची

राज्य सरकारने पुण्यातील कोरोनाबाबत हायकोर्टात दिलेली माहिती चुकीची

पुणे : पुण्यातील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने स्थिती सुधारत आहे. गेल्या २० दिवसात २३ हजाराने रुग्णसंख्या कमी झाली. सुमारे ३ हजार बेड्स रिकामे आहेत. तरीही राज्य सरकारतर्फे पुण्याबाबत उच्च न्यायालयात चुकीची आकडेवारी सादर केली गेली आहे. ही माहिती वस्तूस्थितीदर्शक नव्हती त्यामुळे महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोना परिस्थितीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यात पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असून, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाख आहे, तेथे बेड मिळत नाहीत म्हणून रुग्णांना मुंबईत हलवावे लागत आहे, अशी माहिती उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने पुण्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याचे पडसाद पुण्यात उमटल्याने महापौर मोहोळ यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वस्तुस्थिती समोर आणली.

राज्य सरकारने पुण्यातील कोरोनाबाबत हायकोर्टात दिलेली माहिती चुकीची
पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र सुरु

महापौर म्हणाले, ‘‘पुण्यात एक लाख ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, असे न्यायालयात मांडण्यात आले त्यामुळे कोरोनाची सद्यःस्थिती पुण्यात गंभीर का? असा प्रश्‍न विचारला गेला. मात्र वस्तुस्थिती भिन्न असून, न्यायालयात ज्या दिवशी ही आकडेवारी सादर केली तेव्हा पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार होती. तर मुंबईतील संख्या ५० हजाराच्या पुढे होती. आजही पुणे शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण ३३ हजार ७०० आहेत. गेल्या तीन महिन्यात २ लाख ५० हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यासाठी मोठी व्यवस्था महापालिकेला उभी करावी लागली. या काळात पुणेकरांनी खूप संयम राखला याचे कौतुक आहे. सर्व राजकीय पक्षांनी, सामाजिक संस्था यांनी देखील साथ दिली आहे. नियोजन करताना त्यांचा सहभाग होता. त्यामुळेच शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे.

देशात सर्वाधिक २२ लाख ८० हजार जणांची टेस्टिंग पुण्यात झाले आहे. ९ लाख जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये १ लाख जणांचे दोन्ही डोस झालेले आहेत. महापालिका स्वतःचे ७ ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करत आहेत. त्यात १७०० लिटर प्रत्येक मिनिट क्षमतेचा प्लांट १४ दिवसात दळवी रुग्णालयात सुरू झाला आहे.

राज्य सरकारने पुण्यातील कोरोनाबाबत हायकोर्टात दिलेली माहिती चुकीची
पुण्यातील दारवटकर आजींना कॅनडाहून मदतीचा हात

आजची स्थिती नियंत्रणात असताना, उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या अधिवक्त्याने वस्तुस्थितीचा अभाव असलेली माहिती सादर करण्यात आली. पुण्यात १२ हजार १०७ इतके बेड आहेत. त्यापैकी २ हजार ७३८ बेड रिकामे असून, यात ऑक्सिजन नसलेल्या बेडची संख्या १ हजार ७२९ बेड, ऑक्सिजन ९८९ आणि आयसीयू व व्हेंटिलेटरचे २० बेड रिकामे आहेत. पुण्याची वाटचाल चांगल्या दिशेने सुरू असून, पॉझिटिव्हीटी रेट सध्या १४ ते १५ टक्के आहे. तो पाच टक्क्यांच्या खाली येईल तेव्हाच कोरोना संपला असे मानले जाईल. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी देखील पालिकेने तयारी सुरू केली आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com