स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळासाठी धनंजय मुंडे घेणार पुढाकार

गजेंद्र बडे 
Tuesday, 29 September 2020

लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे राज्यात ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यास गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्यात आले होते. मात्र पुढे प्रत्यक्षात अद्यापपर्यंत हे महामंडळ कार्यान्वित होऊच शकले नाही. याची गांभिर्याने दखल घेत धनंजय मुंडे यांनी ही बैठक घेतली.

पुणे : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खास पुढाकार घेतला आहे. यानुसार मुंडे यांनी आज (मंगळवारी) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत हे महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी त्वरीत कार्यवाही सुरु करण्याचा आदेश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या महामंडळाची रचना, घटना आणि आकृतिबंध तयार करून महामंडळ कार्यान्वित करावे आणि प्राथमिक स्तरावर ऊसतोड कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचनाही धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. या बैठकीला आ. संजय दौंड, सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय आयुक्त प्रशांत नारनवरे,  बार्टीचे महासंचालक धम्मजित गजभिये,  कामगार, ग्रामविकास आणि सहकार खात्याचे उपसचिव, साखर आयुक्तालयातील संचालक उत्तम इंदलकर आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे राज्यात ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यास गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्यात आले होते. मात्र पुढे प्रत्यक्षात अद्यापपर्यंत हे महामंडळ कार्यान्वित होऊच शकले नाही. याची गांभिर्याने दखल घेत धनंजय मुंडे यांनी ही बैठक घेतली.

राज्यात उसतोडणीचा हंगाम येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व ऊसतोड  कामगारांची सरकारकडे नोंद करून त्यांना ओळखपत्र देणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आणि ऊसतोड कामगार व त्यांच्या पशूंना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी हे महामंडळ त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे मत मुंडे यांनी या बैठकीत बोलताना व्यक्त केले. महामंडळाची रचना कशी असावी, घटना, आकृतीबंध तयार करणे, महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, महामंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी या सर्वच विषयांची चर्चा या बैठकीत झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या महामंडळात विभागाचे अधिकारी, साखर कारखाना प्रतिनिधी, प्रत्यक्ष ऊसतोड कामगार, मुकादम व विविध संघटनांच्या प्रतिनिधींना  महामंडळ व घटना समितीमध्ये स्थान देण्याची सूचना त्यांनी केली. 

''राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आर्थिक उत्कर्षासाठी व त्यांच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी महामंडळाच्या माध्यमातून काही कल्याणकारी योजना राबविण्याच मानस आहे. यासाठी निधी उभा करण्यासाठी सहकार विभागासोबत चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे महामंडळासाठी निधी उभा करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे.ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे कायदा लागू करण्यासाठीही पाठपुरावा करणार आहे.''
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative of Dhananjay Munde for Late Gopinathrao Munde Ustod Mahamandal