Accident News : इंदापूर महाविद्यालयासमोर उसाच्या ट्रॅक्टरने खाली आल्याने निष्पाप मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Innocent girl dies in sugarcane tractor accident Indapur college pune

Accident News : इंदापूर महाविद्यालयासमोर उसाच्या ट्रॅक्टरने खाली आल्याने निष्पाप मुलीचा मृत्यू

इंदापूर : इंदापूर शहरातील इंदापूर महाविद्यालयासमोर वेगाने जाणाऱ्या उसाच्या मोकळ्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका निष्पाप अनाथ आश्रमात वाढत असलेल्या शालेय मुलीचा बळी गेला. शनिवार (ता.10) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.इंदापूर येथील माऊली बाल आश्रमातील गेल्या आठ वर्षापासून राहणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या सानिका राजेंद्र लिके (वय 16 वर्षे) ही इलेक्ट्रिक स्कूटीवर शहरातील पुणे-सोलापूर मार्गावरून इंदापूर महाविद्यालय समोरून निघालेली असताना सोलापूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या ट्रॅक्टरने या मुलीला चिरडले. यामध्ये तिचा जागेवरच मृत्यू झाला.

अनेकवेळा धोकादायक ऊस वाहतुक, अवजड वाहनांवर कारवाई करण्यात यावी. शहरात जड वाहनांना बंदी करण्यात यावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली.संबंधित प्रशासनाला निवेदनेही देण्यात आली मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला. असा गंभीर आरोप शहरवासीयांनी केला आहे. यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

इंदापूरकर आक्रमक..

दरम्यान या दुःखद घटनेने इंदापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील नागरिकांनी रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तसेच ऊस वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्गाचा वापर बंधनकारक करावा,उसाची वाहतूक शहरातून होऊ नये ही मागणी आक्रमकपणे लावून धरली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.निष्पाप मुलीच्या गेलेल्या बळीला नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.अनेकवेळा या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.अशी मागणी केली.