लेक मराठवाड्याची; डंका आंबेगावात

दिनेश संजय चव्हाण
Thursday, 14 March 2019

आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे.

आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे.

मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ. आशाताई संजय चव्हाण विवाहानंतर पुणे जिल्ह्यातील अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सर्वसामान्य चव्हाण कुटुंबात सून म्हणून आल्या आणि ‘यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीची भक्कमपणे साथ असते’ या युक्तीप्रमाणे पती संजय चव्हाण यांच्या पाठीशी राहिल्या. त्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या छोट्या उद्योगाच्या रोपट्याचे आज ‘दिनेश उद्योग समूह’ या नावाच्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सुमारे १५० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक जण स्वतःचा उद्योगधंदा सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.

आशाताई यांचे माहेर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका. माहेरी वडिलांची ३५० एकर जमीन आहे. मोठा बारदान. वडील किसनराव रामभाऊ पवार यांनी पंचायत समितीचे सभापतिपद, जिल्हा परिषद सदस्य, बॅंकेचे संचालक, साखर कारखान्याचे संचालक अशी अनेक पदे भूषविलेली. स्वतःची शिक्षण संस्थाही आहे. त्यांचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यामुळे मुलगीही पुण्याकडे द्यावयाची, असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे आशाताई यांचा विवाह चव्हाण कुटुंबातील संजय या उच्चशिक्षित तरुणाबरोबर निश्‍चित झाला. 

आशाताईंचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. लग्नावेळी चव्हाण कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच होती. संजय चव्हाण हे तसे बेरोजगारच होते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करू लागले. त्याचबरोबर व्हिडिओ पार्लर, टेम्पो, ट्रॅक्‍टर, जेसीबी व्यवसाय सुरू केला. माहेर व सासर दोन्ही देशमुखी परिवार असल्याने सुरवातीच्या काही वर्षे आशाताई या घराच्या बाहेर न पडता घराची जबाबदारी पाहू लागल्या. संजय चव्हाण यांनी मित्रांच्या मदतीने यशोदीप गार्डन मंगल कार्यालय सुरू केले. त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. 

आशाताई यांच्या सासूबाई स्वर्गीय लहानूबाई जयवंतराव चव्हाण यांच्या प्रोत्साहनामुळे आशाताई या मंगल कार्यालयात लक्ष घालू लागल्या. आंबेगाव तालुक्‍यात प्रथमच कार्यालयात जेवण वाढण्यासाठी महिलांना संधी दिली. त्या माध्यातून सर्वसामान्य कुटुंबातील ४० ते ५० महिलांना रोजगार उपलब्ध झाला. मंगल कार्यालयाकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहिले नाही.

सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून दरवर्षी गरीब कुटुंबातील ८ ते १० लग्न अगदी अल्पदरात करण्याचा उपक्रम सुरू केला. आतापर्यंत अशाप्रकारे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर एकूण १०० लग्न त्यांनी लावली आहेत. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व स्त्रीजन्माच्या स्वागताचे संदेश दिले आहेत.

अनेकांना रोजगाराच्या संधी
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात व व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी दिनेश पतसंस्थेची स्थापना केली. चव्हाण दांपत्यांच्या मार्गदर्शनामुळे दीपक चवरे, संतोष शेटे, राम गावडे, बाळू पडवळ, उत्तम टाव्हरे, पवन हिले, तय्यब जमादार, अरुण धोत्रे, संदीप थिटे, लता जारकड, सचिन चव्हाण, पिंटू तराळ, राहुल गावडे, ओंकार गावडे ही काही मंडळी स्वतःचा व्यवसाय सुरू करून समाजकार्यातही अग्रेसर आहेत.

समाजकार्याचा वारसा 
आशाताईंना समाजकार्याचा वारसा वडिलांकडूनच मिळाला आहे. त्यांनी दिनेश पतसंस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्या अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत. त्या शेतीसुद्धा उत्तमरीत्या करतात. संजय चव्हाण हे शरद बॅंकेचे माजी संचालक असून, साईनाथ व दिनेश पतसंस्था आणि सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत. आशाताई यांचा मुलगा दिनेश उच्चशिक्षण घेऊन व्यवसायाकडे लक्ष देत आहे. मुलगी वैष्णवी उच्चशिक्षण घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Aashatai Chavan on the occasion of womens day