‘समर्थ’ अक्कांनी निर्मिले शैक्षणिक विश्व

Miratai-Shelake
Miratai-Shelake

मुलांनी स्वकष्टाने यश मिळवावे आणि समाजाची सेवा करावी, अशी त्यांची पूर्वीपासून मनोमन इच्छा असल्याने त्यांच्या मुलांनीही शिक्षणक्षेत्रात ‘समर्थ शैक्षणिक संकुलाच्या’ रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नवनवीन संधी निर्माण करून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले.

सर्वांना सांभाळून घेणारी आदर्श गृहिणी, एक उत्तम सहचारिणी, सक्षम व शिस्तबद्ध आई अशा विविध रूपातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे राजुरी (ता. जुन्नर) येथील सौ. मीराताई वसंतराव शेळके ऊर्फ अक्का. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९५८ रोजी हिवरे बुद्रुक येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव कोंडिबा. वडील शेती करायचे व आई भाजीपाल्याचा व्यापार करायची. हिवरे बुद्रुक, उंब्रज, ओतूर येथे शालेय व महाविद्यालयीन बी. एस्सी पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. येडगाव धरणामध्ये गाव विस्थापित झाल्याने हे कुटुंब खामुंडी या ठिकाणी आले. सन १९७५ मध्ये मीराताई यांचा विवाह जुन्नर तालुक्‍यातीलच राजुरी गावातील वसंतराव शेळके यांच्याशी झाला. वसंतराव हे गंगाराम शेळके व हौसाबाई शेळके यांचे सुपुत्र. दरम्यान, वसंतराव यांनी त्या काळात आयटीआयचा कोर्स पूर्ण करून व्यवसायाला सुरवात केली होती. उच्चशिक्षित असूनही मीराताई यांनी नोकरी न करता एक गृहिणी म्हणूनच जबाबदारी स्वीकारली. घरामध्ये सासू सासऱ्यांबरोबरच दीर बबनराव व ज्ञानेश्वर व नणंदा मंदा व कुंदा तसेच जाऊबाई सुनीता व संगीता यांच्यासोबत त्याही एकत्र कुटुंबात समरस झाल्या. त्या वेळी सासरी राहायला साधं घरही नव्हते. सुरवातीला हे कुटुंब राजुरीतील त्यांचे मामा भगवंता नथू हाडवळे यांच्याबरोबर राहत होते. त्यानंतर मळ्यातून काही काळ भाड्याच्या घरात राहायला लागले. उच्चशिक्षित असूनही कष्टाची कामेही त्यांनी अतिशय आनंदाने केली. संसारात आर्थिक हातभार लावण्यासाठी शिलाई काम शिकून घेतलं. नंतर गावातच स्वतःचे घर बांधले.

मुलांचं शिक्षण आणि घरखर्च भागवताना येणाऱ्या अडचणींवर मात करत, शक्‍य आहे ते करण्याचा प्रयत्न केला. विवेक, वल्लभ आणि वैशाली या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. मोठ्या मुलाने हुंडेकरीचा व्यवसाय सुरू केला. राजुरी गावात असाच एके दिवशी सप्ताहाच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या सेवेतून गुरुचरित्राचे पारायण करण्याचा त्यांना योग आला आणि तेव्हापासून स्वामी समर्थचरणी जी सेवा सुरू झाली ती आजपर्यंत अखंडितपणे सुरू आहे. राजुरीच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी गावकारभारात हिरिरीने सहभाग घेत विविध समित्यांवर सक्रियपणे काम केले. दक्षता समिती, शालेय व्यवस्थापन समिती यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून सक्रियपणे कामाचा ठसा उमटवला. गजानन महाराज महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातील गरजू, होतकरू आणि गरीब महिलांना एकत्रित करून आर्थिक अडचणी, लग्न, शिक्षण, शेती आदींबाबतचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. संतोषी माता नवरात्र मंडळाच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनासाठी पुढाकार घेतला. गेल्यावर्षी बल्लाळवाडीच्या राजाराम पाटील वृद्धाश्रमाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मीराताईंना ‘कर्तृत्ववान महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्या मुलांनी स्वकष्टाने यश मिळवावे आणि समाजाची सेवा करावी, अशी त्यांची पूर्वीपासून मनोमन इच्छा असल्याने त्यांच्या मुलांनीही शिक्षणक्षेत्रात ‘समर्थ शैक्षणिक संकुलाच्या’ रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नवनवीन संधी निर्माण करून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. मुलांना संस्काराची भरभक्कम शिदोरी व कडक शिस्तीचे धडे देणारी तसेच वेळप्रसंगी हळवी होणारी ‘अक्का’ ही त्यांचा प्रेरणास्रोतच आहे. सन २००७ मध्ये या शेळके कुटुंबीयांनी मिळून ‘समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ या शैक्षणिक संस्थेची जी मुहूर्तमेढ रोवली गेली त्यामागील एक स्फूर्तिस्थान आणि मोलाचे योगदान म्हणजे अक्का.

अक्कांच्याच (आई) प्रेरणेतून कल्याणनगर महामार्गावर बांगरवाडी (बेल्हे) च्या माळरानावर समर्थ शैक्षणिक संकुल आकाराला आले आहे. संस्थेच्या ३२ एकर क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आय.टी.आय., एम.बी.ए., फार्मसी, ज्युनिअर कॉलेज, सीनियर कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा इ. मध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष म्हणून वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, तर विश्वस्त म्हणून वल्लभ शेळके हे संस्थेची जबाबदारी सांभाळीत आहेत. या शैक्षणिक संकुलात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत.

संस्थेच्या या जडणघडणीत मीराताई ऊर्फ अक्का यांचा मोठा वाटा आहे. संस्कार, आचार विचार, संस्कृती, आध्यात्मिक गोडी, कृतिशीलता या सर्वच गुणांची शिदोरी, मीराताईंनी आपल्या मुलांना दिली आणि त्याच जोरावर हे ‘समर्थ’ शैक्षणिक संकुलाचं शैक्षणिक विश्व उभं ठाकलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com