पाचशे महिला एकमेकांशी जोडल्या

रूपालीताई पानसरे
शुक्रवार, 15 मार्च 2019

चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे.

चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे.

शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना आई-वडील यांनी लहानपणी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे मला सार्वजनिक कामाची आवड निर्माण झाली. तर, लग्नानंतर पतीने दिलेल्या खंबीर साथीमुळे मी गेली पंधरा वर्षे राजकीय क्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने झटून काम करीत आहे. घरच्या लोकांनी आणि राजकीय क्षेत्रातील खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांनी माझ्या सामाजिक कामासाठी सततच्या दिलेल्या भक्कम साथीमुळे मी केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता घराबाहेर पडून माझ्या वैयक्तिक संसाराबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील इतरांच्या संसारालाही हातभार लावण्याचा माझा खारीचा वाटा असल्याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. सन २००९ मध्ये तेजस्विनी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून आळंदी आणि परिसरात सुमारे पंचवीस महिला बचत गट स्थापन केले. यामुळे पाचशेहून अधिक महिला एकमेकींशी जोडल्या गेल्या.

सर्व महिलांमध्ये संवादाचे वातावरण तयार होऊन  एकमेकींचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, याचीच चर्चा नेहमी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही घडवून आणतो. यामुळे इतर सर्वसामान्य महिलांमधेही नेतृत्व गुण निर्माण होण्यास मदत झाली. 

महिलांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देण्यासाठी नामवंत यशस्वी महिला, तसेच राजकीय क्षेत्रातील  महिलांचे मार्गदर्शन सातत्याने घेत आले. यामुळे स्थानिक महिलांना परकर, इमिटेशन ज्वेलरी, केटरिंगसारखे प्रशिक्षण वेळोवेळी शिबिरे घेऊन देण्यात आली. याचा परिणाम चांगला झाला आणि महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाले आणि सोबत पैसाही. नव्याने विवाहित झालेल्या आणि मराठवाडा, खान्देश भागातून आलेल्या महिलांना सिल्क रेड ज्वेलरी धाग्यांचे साहाय्याने कशी बनविली जाते आणि त्याची विक्रीचे सुमारे एक महिन्यांचे प्रशिक्षणही बचत गटाच्या माध्यमातून दिले. 

खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार वंदनाताई चव्हाण आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांच्या सहकार्याने यशस्विनी सामाजिक अभियानाद्वारे समन्वयक म्हणून काम करताना मी दीड वर्षे सतत खाद्य पदार्थांची विक्री कसे करायचे, याचे मार्गदर्शन महिलांना दिले. याचबरोबर प्रशिक्षित महिलांना मार्केटिंग केल्याबद्दल प्रशस्तिपत्रकही दिले.

स्थानिक महिलांना रोजगार मिळावा, यासाठी वीज मंडळाची लाइटबिले वाटपाची कामे मिळवून दिली. कुटुंबातील दैनंदिन कामे सांभाळून स्थानिक रोजगाराच्या शोधार्थ महिलांना दुपारच्या वेळेत हाताला काम मिळाल्याचा आनंद या माध्यमातून झाला. 

चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी गेली एक वर्षापासून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये महिलांच्या राहणीमानापासून इतरांशी संवाद कसा साधायचा, वक्तृत्व कसे करायचे, यासारख्या कलागुणांना वाव मिळविण्याच्या दृष्टीने महिलांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम गेली वर्षभर करीत आले आहे. अनेक महिला आता स्वयंप्रेरणेने सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेताना दिसून येत आहे.

याशिवाय आळंदी पालिकेने गेली तीन वर्षांपासून शहरात प्लॅस्टिक बंदी लागू केल्यामुळे सामानचिज वस्तूंची हाताळणी करण्यासाठी कापडी पिशव्यांचा प्रश्‍न होता. यावर मार्ग काढण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कागदी आणि कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्या विकण्याचे तंत्रही शिकवले. याचबरोबर आता महिला पुढे जाऊन लेदर बॅग बनविण्याची कलाही आत्मसात करू लागल्या. पत्रावळ आणि द्रोण बनविण्यास प्रोत्साहन दिले. मी सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या कामाचा आनंद मला मिळू लागला. मला सातत्याने प्रोत्साहन देणारे माझे आई, वडील, भाऊ आणि पती यांचाही माझ्या यशात मोलाचा वाटा असल्याने मला त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. कुणाच्याही सहकार्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही. माझ्या आप्तजनांनी माझ्या सामाजिक राजकीय क्षेत्रात दिलेले पडद्यामागचे योगदान मी विसरू शकणार नाही. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य कायम माझ्या मनात घर करून राहिल्याने महिलावर्गासाठी काम करण्याची ऊर्मी मला सतत बळ देत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Rupalitai Pansare on the occasion of womens day