esakal | कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा

बोलून बातमी शोधा

Inspirational work of volunteers at the Covid Center at Karve Education Institute
कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा
sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरूड : कर्वे शिक्षण संस्थेच्या केंद्रावर आलेल्या रुग्णांच्या मनाला आधार देणारी एक फौजच इथे २४ तास कार्यरत आहे. येथून बरा होऊन बाहेर जाणारा प्रत्येकजण जगण्याची नवीन दिशा घेऊन जातो. शारीरिक दुरावा अपरिहार्य असला तरी, मानासिक ओलावा इथे अखंड अनुभवायला मिळतो.

कर्वे शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरने हळूहळू विरंगुळा केंद्राचे रूप धारण केले आहे. दिवसभर गप्पा, गाणी, प्रवचन, भजन-कीर्तन ऐकणे, ओळख असो नसो एकमेकांची आस्थेने चौकशी करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जेवण जागेवर पोहोचवणे, प्राणायाम असे विविध उपक्रम येथे सुरू आहेत. केंद्रात येताना रुग्ण तणावात येतो. जाताना भयमुक्त हास्य तसेच स्वयंसेवक व यंत्रणा यांच्या प्रतिची कृतज्ञता दिसते.

हेही वाचा: पुणे महापालिकेकडून तीनशे बेड्सची सोय; मात्र ऑक्सिजनअभावी सोय थांबली

कोविडची दहशत सगळीकडे पसरली असताना कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणा्ऱ्या प्रा. अनुराधा येडके, ऋषीकेश मुदगल, श्रृती शिधये, मेधेय चड्डा, राज तांबोळी, शिवानंद आपटीकर, इंद्रजा गानू, स्वप्नील शेवडे, अथर्व पुंडे यासारख्या तरुणांचे काम प्रेरणादायी आहे. गेल्या वर्षी गरवारे महाविद्यालय व यावर्षी कर्वे शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये हे युवक रात्रंदिवस सेवाकार्य करत आहेत.

येथे दिवस चालू होतो ते रुग्णाच्या काढा वाटपाने. मग चहा-नाश्ता, तपासणी, दुपारचे जेवण, डॉक्टरांची पाहणी -रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम, घरी परत जाणाऱ्यांसाठी समुपदेशन, रात्रीचे जेवण, दिवसातून तीन-चार वेळा पीपीई कीट घालून रुग्णांची विचारपूस, इमारती स्वच्छता, कोणाला काही अडचण नाही ना हे पहाणे, त्यांना धीर देणे, असा भरगच्च दिनक्रम असतो. तोही न थकता, स्वतःचे दुःख बाजूला सारून, हसतमुखाने.

निवासी स्वयंसेवक आणि डॉक्टर यांच्या कामाच्या वेळा संपून गेल्या तरी सर्वजण स्वयंस्फूर्तीने अविरत काम करत असतात. येथे २५ स्वयंसेवक काम करत असून आणखी स्वयंसेवक हवे आहेत. ४५ पेक्षा कमी वयाच्या, किमान चौदा दिवस पूर्णवेळ देवू शकतील अशांनी ८७६७५२८७४३ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

img

हेही वाचा: 'पीएमआरडीए'चा विकास आराखडा पुन्हा लांबणीवर

''गेल्यावर्षी कोविड केअर सेंटरला स्वयंसेवक म्हणून येण्यापूर्वी मनाची घालमेल झाली होती. घरच्यांचाही विरोध होता, परंतु ‘राष्ट्र प्रथम’ या जाणिवेने त्यावर मात करून मी आले होते. यावर्षी मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच मी इथे आहे. समाजाची गरज पाहता कुटुंबातूनही शंभर टक्के पाठिंबा मिळाला.''

- अनुराधा येडके, स्वयंसेवक

''कोरोनाचे निदान झाले की, रुग्ण मानसिकरित्या अर्धमेला होतो. सर्व स्वयंसेवक त्यांच्याशी अगदी आपुलकीने वागत असल्याने त्यांना आजारातून सावरायला चांगलीच मदत होते. हताश, निराश आणि भीती घेऊन आलेला प्रत्येक रुग्ण जाताना भरभरून आशीर्वाद देतो. आभार व्यक्त करताना आलिंगन देता आले नाही तरी नेत्रालिंगन मात्र ते निश्चित देतात.''

- राज तांबोळी, स्वयंसेवक

हेही वाचा: शिफारशी झेडपी सदस्यांच्या, श्रेय आमदारांचे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे गोंधळ