
पुणे : आर्थिक साक्षरता मोहिमेत विद्यार्थी बनणार प्रशिक्षक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांची जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता मोहिमेत प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना बॅंकेचे व्यवहार, बॅंकेच्या सेवा सुविधांबाबत माहिती देऊन बॅक आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा अग्रणी बॅक, नाबार्ड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, भारतीय डाकसेवा यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑक्टोबरच्या सुरवातीला आर्थिक साक्षरता मोहीम उपक्रमाचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील महिला, शेतकरी, छोटे व्यावसायिक, युवक-युवती यांना बॅंकेच्या सेवा सुविधांबाबत माहिती देऊन बॅक व ग्रामीण नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधणे आणि प्रत्येक ग्रामीण नागरिकाला बॅंकेच्या सेवा सुविधा वक्तशीर आणि किफायतशीरपणे मिळणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
हेही वाचा: एका निनावी पत्रादवारे आक्षेपार्ह टिपण्णी दिलेल्या धमकीचा निषेध
ही मोहीम राबविण्यासाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षक निवडले जाणार आहेत. त्यांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्षात प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत १३ तालुक्यासाठी प्रत्येकी एक प्रशिक्षक, तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रती ग्रामपंचायत एक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी ‘‘https://forms.gle/Nb86jbFyTFC72Nds5’’ या गुगल लिंकद्वारे नावनोंदणी करावी, तसेच नोंदणी करताना संबंधित स्वयंसेवकाने एकच ग्रामपंचायतीची माहिती भरावी, असे आवाहन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले आहे.
Web Title: Instructor Become Student Financial Literacy Campaign
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..