

दौंड, ता. ९ : बनावट वैद्यकीय अहवाल, आधार कार्ड, डॉक्टरांचा शिक्का आणि अन्य डॉक्टरांच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दौंडमधील एका डॉक्टरसह एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी बुधवारी (ता. ९) ही माहिती दिली.
खासगी विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक अभिजित मोरे (रा. हडपसर, पुणे) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विशाल गोविंद मिसाळ, पत्नी माधुरी विशाल मिसाळ (दोघे रा. गवळीवाडा, दौंड) आणि विमाधारक संकेत राजू होले (रा. पोस्ट ऑफिसजवळ, दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार विमाधारक संकेत राजू होले यांनी १३ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित रुग्णालयात उपचार घेतल्याचे दाखवून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा दावा सादर केला होता. संशय आल्याने कंपनीने कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यामध्ये अनियमितता आढळली. दाव्यासोबत सादर केलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या अहवालावर डॉक्टरांचे नाव, स्वाक्षरी आणि वैद्यकीय नोंदणी क्रमांक होता. मात्र, अधिकृत संकेतस्थळावर पडताळणी केली असता तो क्रमांक संबंधित डॉक्टरांच्या नावावर नसल्याचे आढळल्याचा दावा फिर्यादीने केला. प्रमाणपत्रावरील क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) स्कॅन केल्यानंतर अन्य व्यक्तीचे नाव आणि वेगळा नोंदणी क्रमांक दिसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आधार कार्डावरील नाव व जन्मतारीख आणि अधिकृत नोंदींमध्येही तफावत आढळल्याचा आरोप आहे. तिन्ही संशयितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास दौंडचे पोलिस हवालदार अमीर शेख करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.