पोलिस अन्‌ महिला पत्रकारांचा संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

पोलिस आयुक्तालयामध्ये भरोसा सेल, सेवा कार्यप्रणाली, नियंत्रण कक्ष व पाचही परिमंडळांमध्ये ४० टक्के महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी कामकाज पाहतात. याबरोबरच १० पोलिस उपायुक्तांपैकी दोन महिला पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी त्यांच्या गुणांच्या बळावरच तेथे कार्यरत आहेत.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे 

पुणे - एरवी गुन्हेगारीच्या बातम्यांच्या निमित्ताने एकत्र येणारे पोलिस अन्‌ महिला पत्रकार महिला दिनानिमित्त एकत्र आले. महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महिला पत्रकारांशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या संकल्पनेतून शहरातील महिला पत्रकारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी डॉ. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड आदी उपस्थित होते. बैठकीसाठी ५० हून अधिक महिला पत्रकार उपस्थित होत्या.

गायकवाड यांनी पुणे पोलिसांतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबतची माहिती दृक्‌श्राव्य सादरीकरणाद्वारे करून दिली. महिला पोलिस आणि महिला पत्रकारांनी एकमेकांच्या कामाच्या पद्धती, त्यांना येणाऱ्या अडचणी व प्रसंग जाणून घेतले.

पोलिसांकडून नागरिकांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सामाजिक सुरक्षा विभाग, दामिनी पथक, निवडणूक बंदोबस्त, सेवा कार्यप्रणाली अशा विविध कामांचे या वेळी दृक्‌श्राव्य सादरीकरण करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction of police and female journalists