esakal | सातासमुद्रापार गोडी सप्तसुरांची; ऑनलाईन माध्यमांद्वारे जपली जातेय आवड

बोलून बातमी शोधा

hobby

कथक नृत्याचेही धडे
कथक नृत्यांगना अवनी गद्रे यांच्याकडे अनेक विद्यार्थिनी नृत्याचे धडे घेत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना प्रत्यक्ष वर्गांसाठी उपस्थित राहता येत नाही. मात्र, ऑनलाईन माध्यमांद्वारे धडे दिले जात आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह परदेशातील प्रशिक्षणार्थींनाही पदन्यास शिकविले जात आहेत, अशी माहिती गद्रे यांनी दिली. त्या म्हणाल्या, लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर व्हॉट्‌सॲपद्वारे नृत्याचे छोटे छोटे धडे दिले जात आहेत. परदेशातील नृत्य साधकांना सुरूवातीचे धडे अवघड जातात, पण ऑनलाईन माध्यमांचा वापर करूनही ते सुंदर नृत्य करायला शिकतात.

सातासमुद्रापार गोडी सप्तसुरांची; ऑनलाईन माध्यमांद्वारे जपली जातेय आवड

sakal_logo
By
सचिन वाघमारे

पुणे - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात सर्वांना घरामध्ये रहावे लागत आहे. त्यामुळे घरामध्ये बसून अनेकजण आपल्यापरीने वेळ घालविण्याचा प्रयत्न करत आहेत. संगीत ऐकणे हा त्यातीलच एक विरंगुळा. पण, अगदी कोराना येण्यापूर्वी आणि आता त्याचा संसर्ग पसरत असतानाही भारतीय शास्त्रीय संगीताची आवड ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून जगभर जपली जात आहे. पुण्यातील दिग्गजांसह नवोदितही गायन, वादनाचे ऑनलाईन धडे देत आहेत. विशेष, म्हणजे या माध्यमातून सातासमुद्रापर सप्तसुरांची गोडी जपली जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय संगीताची जादू अनेक वर्षांपासून आहे. अगदी लोकगीतांपासून ते सुगम, शास्त्रीय, फ्युजन अशा विविध प्रकारच्या संगीताची आवड प्रत्येकामध्ये असते. त्याची भुरळ परदेशातील नागरिकांना पडली नाही तरच नवल. मात्र, हे नागरिक आता फक्त संगीत ऐकण्यापुरतेच थांबले नाहीत तर ते स्वत:च आता गायन आणि विविध वाद्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यासाठी स्काईप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांचा वापर केला जात आहे.

परदेशातील काही विद्यार्थी अतिशय समर्पित भावनेने संगीत शिकतात. काहीजण व्यवसाय सांभाळून आवड म्हणून संगीत शिकतात. त्यामध्ये डॉक्‍टर, आयटी प्रोफेशनल्स, महिला यांचा समावेश असतो. ऑफिस सुटल्यानंतर ते आपल्या लॅपटॉपसमोर येऊन बसतात आणि भारतातील गुरुंशी कनेक्‍ट होऊन रोजच्या धड्यांना सुरूवात करतात.

अनेक वर्षांपासून स्काईपद्वारे परेदशातील विद्यार्थ्यांना संगीत शिकवत आहे. ऑनलाईन शिकून अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने या विषयात एम.ए. पूर्ण केले आहे. एकावेळी तीन ते चार लॅपटॉप समोर ठेवून मी शिकवतो कारण, प्रत्येकाला वेगळा वेळ देता येत नाही. ऑनलाइनमुळे संगीत सर्वदूर पोहचले आहे. 
- पं. विकास कशाळकर, गायक

अभिषेक मारोटकर यांनी सुरू केला अभ्यासक्रम
आपल्याला मोकळा मिळालेला वेळ संगीत शिक्षणासाठी द्यायचा असल्यास गायक अभिषेक मारोटकर यांनी संगीताचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. पूर्वीपासूनच ते स्काईपच्या माध्यमातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत. ऑनलाईन संगीत शिक्षणाची एक चांगली बाब म्हणजे घरबसल्या कोणत्याही शहरातून आपल्याला हे शिक्षण घेणे शक्‍य आहे. या वर्गासाठी अभ्यासक्रमात ब्रीदिंग टेक्‍निक ओंकार साधना, अलंकार, स्वर रियाज, लय-तालाचा अभ्यास, व्हॉइस कल्चर, वेगवेगळ्या गाण्याचा अभ्यास, शास्त्रीय संगीत, कराओके इत्यादीचा समावेश असेल.

दहा वर्षांपूर्वी मी युक्रेनमध्ये म्युझिक कन्सर्ट ऐकली, ते ऐकताच मला असे जाणवले हे मला शिकायचे आहे. तेव्हापासून मी भारतीय गायन शिकायला सुरूवात केली. आता मी हार्मोनियमही वाजवते. माझ्या नशीबाने मला प्रसादे खापर्डे हे गुरू म्हणून लाभले. भारतीय संगीत हे शब्दांच्या पलीकडे आहे. रियाज सुरू करते तेव्हा चैतन्याचा अनुभव येतो.
- लिझा वुल्फ, दक्षिण युक्रेन, रशिया.