esakal | मी पृथ्वी सोडणार नाही : डॉ. नारळीकर

बोलून बातमी शोधा

dr jayant narlikar}

विश्वनिर्मितीच्या महाविस्फोट (बिग बॅंग) सिद्धांताच्या विरुद्ध ‘स्थिर विश्वाचा सिद्धांत’ (स्टेडी स्टेट) मांडला जातो. डॉ. नारळीकरांचे गुरू प्रा. फ्रेड हॉएल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सिद्धांतासंबंधी संशोधन केले होते.

मी पृथ्वी सोडणार नाही : डॉ. नारळीकर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  : कोरोना विषाणूपासून ते विश्वाचा शेवटाबद्दलचे कुतूहल, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, उत्तर देणारे शास्त्रज्ञ, विविध विषयांवरील व्याख्याने आणि भरगच्च प्रयोगांची रेलचेल अशा बहुरंगी कार्यक्रमांनी यंदाच विज्ञानोत्सव साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच संस्थांनी कार्यक्रमांचे व्हर्च्युअल आयोजन केले होते. ऑनलाइन पार पडलेला हा विज्ञानोत्सवात जगभरातील नागरिक सहभागी झाल्याने तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए), आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सायन्स पार्क, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस), मुक्तांगण विज्ञान शोधिका आदी संस्थांनी यूट्यूब, वेबिनार, फेसबुक आदी ऑनलाइन माध्यमांद्वारे व्याख्याने, चर्चासत्रे आणि प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

मी पृथ्वी सोडणार नाही ः डॉ. नारळीकर

पुणे : सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण आणि संसाधने दुसऱ्या ग्रहावर मिळणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे पृथ्वीला सहज सोडणे सोपे जाणार नाही. आपण मंगळावर गेलो तरी श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये कोण रूपांतर करणार? त्यामुळे मी तरी मंगळावर जाणार नाही, असे उत्तर शास्त्रज्ञ डॉ. मंगळा नारळीकर यांनी दिले.

‘आयुका’च्यावतीने ‘शास्त्रज्ञांशी थेट संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात डोंबिवली येथील अपूर्व वैद्य याने ‘दुसऱ्या ग्रहावर मानवी वस्ती होईल का?’ या आशयाचा प्रश्न विचारला होता. त्यावेळी डॉ. मंगला नारळीकर यांनी हे उत्तर दिले. कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. शोमक रॉयचौधरी, डॉ. सुहृद मोरे आणि डॉ. अनुप्रीता मोरे उपस्थित होते. सध्या तरी मानवी वस्तीसाठी पृथ्वी इतका योग्य दुसरा ग्रह नाही. जर तुमचे काही आर्थिक हितसंबंध असतील किंवा काही संसाधने मिळवायची असतील तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यास जाऊ शकतो, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले. निदान पुढील शंभर वर्षे तरी माणसाला पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती करण्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे पृथ्वीशीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवत, तिचेच संवर्धन करणे गरजेचे आहे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.

कोलकता येथील गोपाल मोंडल यांनी प्राथमिक शिक्षणातच खगोलशास्त्राचा समावेश असावा का?, हा प्रश्न विचारला होता. उच्च प्राथमिक वर्षापासूनच निश्चितच खगोलशास्त्र शिकवले जावे, असे मत डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. हे शिकवत असताना विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणिताचा सुरवातीपासूनच आग्रह धरू नये, असे मत डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केले.

नवे बदल स्वीकारतोय

विश्वनिर्मितीच्या महाविस्फोट (बिग बॅंग) सिद्धांताच्या विरुद्ध ‘स्थिर विश्वाचा सिद्धांत’ (स्टेडी स्टेट) मांडला जातो. डॉ. नारळीकरांचे गुरू प्रा. फ्रेड हॉएल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सिद्धांतासंबंधी संशोधन केले होते. आजवर मिळालेले पुरावे हे महाविस्फोटाच्या सिद्धांताला पूरक आहेत. त्या तुलनेने स्थिर विश्र्वाचा सिद्धांताबाबत कमी पुरावे मिळाले आहेत. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नारळीकर म्हणाले,‘‘नवीन संशोधन करताना वैचारिक खुलेपणा स्वीकारायला हवा. १०० वर्षापूर्वीच भौतिकशास्त्रातील सिद्धांत आणि आजचे सिद्धांत यात मोठा बदल झाला आहे. विश्वाबद्दल अजूनही आपल्याला फार कमी माहीत आहे. कोणताही सिद्धांत नाकारणे सहज शक्य नाही. मात्र, त्याच्या समर्थनार्थ आपल्याला जास्त पुरावे गोळा करावे लागतील. बिग बॅंगची स्पष्टता देणाऱ्या ‘रेड शिफ्ट’ बद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण त्यासंबंधीही नवे संशोधने समोर येत आहे. निश्चितच नवे बदल आम्ही स्वीकारत आहोत.’’