जागतिक महिला दिन : सहा जणींची कहाणी पिढ्यान्‌पिढ्यांची

आज ८ मार्च... जागतिक महिला दिन... आजचा हा दिवस उत्साहाने साजरा करायचं समृद्धीने ठरवलं होतं, त्यासाठी तिने खूप दिवस आधीपासूनच आपल्या मोठ्या बहिणीला सांगून अन्‌ आईची मनधरणी करून तिची परवानगी मिळवली
International Women Day Article
International Women Day Articlesakal

आज ८ मार्च... जागतिक महिला दिन... आजचा हा दिवस उत्साहाने साजरा करायचं समृद्धीने ठरवलं होतं, त्यासाठी तिने खूप दिवस आधीपासूनच आपल्या मोठ्या बहिणीला सांगून अन्‌ आईची मनधरणी करून तिची परवानगी मिळवली होती. आईने परवानगी देताच मॅडमची जय्यत तयारी सुरू झाली. समृद्धी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होती. समृद्धीला एक मोठी बहीण होती; पण भाऊ नव्हता. पण तिच्या आजीला मात्र घरात मुलगा हवा होता, त्यावरून ती समृद्धीच्या आई-वडिलांना सतत ऐकवत असे. पण समृद्धीचे आई-बाबा मात्र कधीच मुलींना मुलांपेक्षा कमी समजत नव्हते. त्यामुळे समृद्धीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावलं. शेजारच्या ताई-मावशींनाही बोलावलं. आईच्या मैत्रिणींना सांगितलं. इतकंच काय, आजीच्या ज्येष्ठ नागरिक संघातल्या मैत्रिणीही आल्या होत्या त्या कार्यक्रमाला. सर्वांनी मिळून एक छानसा केक डेकोरेट केला आणि सेलिब्रेशन सुरू केलं. तितक्यात आजी ओरडली, ‘‘मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा करण्यापेक्षा आजच्या निमित्तानं तुम्ही आपापलं मनोगत व्यक्त करा. मला म्हातारीला समजू तरी द्या, महिला दिनाविषयी, महिलांविषयी तुम्हाला काय वाटतं ते...’’

हवं फ्रिडम...

सुरुवातीला आढेवेढे घेत १५ वर्षांची समृद्धी सणस बोलू लागली, ‘‘शाळेत आम्हाला मुलगा-मुलगी समानतेबाबत शिकविण्यात येतं; पण मुलींनी मुलांशी जास्त बोललेलं चालत नाही. का, मुलगा-मुलगी हे कधी एकमेकांचे मित्र-मैत्रीण असू शकत नाही का? त्यामुळे खरंच मुलगा-मुलगी समानता नेमकी कशी असावी, हेच समजत नाही. एकीकडे सगळे म्हणतात, मुलींना सगळ्या क्षेत्रांत संधी द्या, तर दुसरीकडे आम्हाला मुली म्हणून जास्त वेळ बाहेर खेळताही येत नाही. घराबाहेर उशिरापर्यंत मुलींनी थांबायचं नाही, हे तर जणू काही पाठ झालेलं वाक्यच आहे. मग आम्ही ‘फ्रिडम’ तरी कशाचा समजावा? मी बरेचदा आई-बाबांना बोलताना ऐकते, की आजकाल मुलींवर अत्याचार खूप होत आहेत. ताई कॉलेजसाठी बाहेर पडते, तेव्हा तिलाही बस किंवा रिक्षामधून प्रवास करावा लागतो. यातूनही आईला माझी आणि ताईची काळजी वाटते हे दिसून येतं.

पण माझ्या आईप्रमाणेच त्रास देणाऱ्या त्या मुलांची आईही स्त्रियाच असतात ना, मग मुलींशी कसं वागावं, हे त्या आपल्या मुलांना का नाही सांगत?

आपल्या देशाचं सरकार आज महिलांच्या सुरक्षेसाठी खूप काही करत आहे; पण मुलांना जर महिलांचा आदर करायला शिकवलं, तर इतर कोणत्या उपायांची गरजच पडणार नाही. आम्ही मुली जेव्हा सोसायटीमध्ये खेळतो, तेव्हा सांगितलं जातं, तुम्ही मुली आहात आणि मुलींनी इतक्या वेळपर्यंत खेळणं चांगलं नाही. उशिरापर्यंत खेळण्याचा अधिकार हा फक्त मुलांनाच आहे का? फक्त आम्हालाच सांगितलं जातं, की असे कपडे घालू नका, मुलांसोबत मैत्री करू नका, उशिरापर्यंत घराबाहेर राहू नका... त्‍यामुळे मला नाही वाटत, की ही समानता आहे. माझे बाबा आर्मीमधून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना वाटतं की, मीसुद्धा तसंच काही तरी करायला हवं. मलाही विमानांची आवड आहे, त्यामुळे भविष्यात एअरफोर्समध्ये मला करिअर करायचं आहे. माझ्या बाबांनी कधीच आम्हाला मुलांपेक्षा कमी वागणूक दिलेली नाही. शिक्षण असो की इतर सोयी-सुविधा, त्यांनी नेहमीच मला आणि माझ्या ताईला सर्व गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्यात उद्याची स्वप्नं पाहतात. पण समाजातही मुलींकडे पाहण्याचा तसा बदल व्हायला हवा. नक्कीच व्हायला हवा. हो ना?’’

करावी लागतेय तडजोड...

टाळ्यांच्या कडकडाटात समृद्धीने आपलं मनोगत संपवलं आणि २६ वर्षांच्या रोशनी सोलंकी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. त्या सांगू लागल्या, ‘‘आज मी जितक्या मोकळेपणाने वावरते, निर्णय घेऊ शकते, ते केवळ त्या महिलांमुळे, ज्यांनी या समाजात स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला. मग त्या आनंदीबाई जोशी असोत किंवा सावित्रीबाई फुले; खरंतर त्यांच्यामुळेच मला समाजात वावरण्याचं स्वातंत्र्य मिळालं. मी जेव्हा तीन-चार वर्षांची होते, तेव्हा आमचं सोलंकी कुटुंब राजस्थानातून पुण्यात स्थलांतरित झालं. राजस्थान सोडून आम्ही पुण्याला आलो; पण खरं सांगू, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं, त्या वेळी आमची आर्थिक परिस्थिती अगदी जेमतेम होती. पप्पांचा कसाबसा चालणारा कटलरीचा व्यवसाय होता. आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आईनेही काबाडकष्ट घेतले. तिने बेंटेक्सचे दागिने घरोघरी जाऊन विकायला सुरुवात केली. आम्ही लहान असल्यामुळे आई आपल्यासाठी इतकं काही करतेय, हे त्या वयात समजत होतंच असं नाही. मेंदूतील रक्तस्रावामुळे आई आता या जगात नाही; पण ती शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होती. आईची एक शिकवण मात्र आम्ही कधीच विसरणार नाही. ती नेहमी म्हणत असे, कोणतंही काम करताना शून्यातून सुरू करत प्रगती करता आली पाहिजे. कदाचित म्हणूनच आज मी माझं काम आणि घर दोन्हीही व्यवस्थित सांभाळत आहे. मला आणि दादाला ती म्हणत असे, तुम्ही दोघं जेव्हा काम करू लागाल, तेव्हा मी आराम करणार. पण ती एकाएकी आम्हाला सोडून गेली. मुलगी असल्यामुळे काही गोष्टींत मला ‘कॉम्प्रमाइज’ही करावं लागलं. माझ्या मोठ्या भावाच्या पाठीवर जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा आजीला दुसऱ्यांदाही मुलगाच हवा होता. मला ते जाणवायचं. बऱ्याच गोष्टींसाठी मला अडजेस्टमेंट करावी लागत होती. शाळेत असताना दादाला नववीत ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळाले. तेव्हा नववीत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हडपसरमध्ये दहावीच्या तीन महिन्यांच्या ब्रीज कोर्ससाठी शाळा पाठवत असे आणि तेही मोफत. दादा गेला होता, मलाही जायचं होतं. म्हणून मीसुद्धा खूप अभ्यास केला आणि नववीत दुसरी आले. पण पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर दोन्ही मुलंच होती. मग काय, एकही मुलगी नाही तू जाऊ नकोस असं सांगत आईने मला जाऊ दिलं नाही. पदवीच्या शिक्षणावेळी मला सांगण्यात आलं, की दादाच्या शिक्षणासाठी आधीच कर्ज काढलंय. तू सध्या काही तरी कोर्स कर, कारण आता तुझी ‘फी’ भरायलादेखील पैसे नाहीत. मग काय, मन मारून घेतलं प्राणिशास्त्राचं शिक्षण; आणि मग डाएटिशियनचा कोर्स केला.

आई-पप्पांना खरंतर माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती. शिकून ही काय करेल, हिला तर लग्नच करायचंय, मग कशाला शिक्षणात पैसे खर्च करायचे? पण आज पप्पांना माझा अभिमान वाटतो, कारण मी माझ्या क्षेत्रात चांगलं काम करत आहे.

पूर्वी शेजारी कोणाच्या घरी मुलगी झाली आणि ते मिठाई घेऊन आले, की आजी त्यांना अभिनंदन म्हणण्याऐवजी पुढच्या वेळी मुलगाच होईल बरं का, असं सांगायची. ही गोष्ट मला सतत खटकत असे. मुलगा असो की मुलगी, भेदभाव नको. माझं लग्न झाल्यावर माझ्या मुलांमध्ये ही समानतेची शिकवण मी रुजविणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असं नेहमी म्हणतात. पण मला त्या यशामध्ये मागे नसून सोबत राहायचं आहे. ही गोष्ट समाजात जर सगळ्यांना कळाली, तर नक्कीच स्त्री-पुरुष समानतेचा एक टप्पा आपण पार करू. आता मुलींसाठी काही क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. हळूहळू मुलींना इतर क्षेत्रांमध्येही तोच दर्जा मिळेल.’’

सिद्धतेची धडपड

आता नंबर होता ३६ वर्षीय मोनाली गरुड मॅडमचा. नाशिकसारख्या शहरात शिक्षण घेऊन पुण्यात करिअरसाठी आलेल्या मोनाली गरुड यांचा कंपनीतीलच एका मुलाबरोबर प्रेमविवाह झाला. आता पती व दोन मुलांबरोबर त्या संसार आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पार पाडत आहेत. वयाच्या ३५ वर्षांच्या आसपासचा अनुभव आता त्यांच्या गाठीशी जोडला गेलाय. मोनाली या खरंतर खेळाडू. शाळेत असताना आणि पुढे कॉलेजला गेल्यानंतरही त्यांच खेळालाच प्राधान्य राहिलं, त्यामुळे तंदुरुस्ती, खेळाडूवृत्ती आणि सहजासहजी कोणत्याही संकटासमोर गुडघे न टेकविण्याची नैसर्गिक वृत्ती त्यांच्यात सहज दिसून येते. त्या म्हणाल्या, ‘‘मुलींनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, या विचारांच्या बीजाला अंकुर फुटला, त्या वेळी शिक्षणाला सुरुवात झालेली, त्यामुळे माझ्या घरात मुलाला शिकवायचं आणि मुलीला घरकाम, हा विचार कधीच नव्हता. मुलगा असो की मुलगी त्यांच्यात विषमता असेल ती फक्त शारीरिक, बाकी सर्व गोष्टी समानच.

शिक्षणात, करिअरमध्येही ‘केवळ मुलगी’ या एकाच निकषावर कधीच डावललं गेलं नाही, किंवा ‘एक मुलगी’ प्रयत्न करतेय, तिला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणून किंवा मुलगी असल्याचा ‘फायदा’ (अँडव्हॅटेज) घ्यावा अशी कधी वेळच आली नाही. जे झालं ते ‘ऑन मेरिट’!

अगदी लहानपणापासूनच मुलगा आणि मुलगी हा फरक माझ्या आई-वडिलांनी कधी जाणवूच दिला नाही. शिक्षण संपलं. नोकरीला सुरुवात करायची तर, ‘बेसिक ग्रॅज्युएशन’वर काही होणार नाही, हे लवकरच कळालं. त्यामुळे वेगवेगळे कोर्सेस केले. त्या आधारावर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (एमएनसी) प्रवेश परीक्षा पास होत गेले. जीवन जगण्याचा एक सूर मिळाला. त्यात महिला म्हणून मागे पडत असल्याचा विचार कधीच मनाला शिवला नाही. आधुनिक जीवनशैलीत नातेसंबंध हे वेगाने बदलत आहेत. पूर्वी वर्षानुवर्षं टिकणारे, जपणारे कुटुंबातील नातेसंबंध आता तकलादू झाल्याचं अवती-भोवती घडणाऱ्या घडामोडींवरून दिसतं. मुली शिकल्या, त्या मोठ्या झाला, त्या नोकरी करू लागल्या की त्यातून स्वतःची मतं तयार होतात, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, त्यातून निर्णयक्षमता निर्माण होते. मात्र, नेमक्या या वेळी त्यांचा जोडीदार मात्र या विचारांचा आदर करणारा असायला हवा. महिलांची सुरक्षितता हा विषय आता पुणे किंवा नाशिकसारख्या शहरांमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात आहे, असं वाटत नाही. निर्भया प्रकरणानंतर महिलांना सुरक्षितता हा मुद्दा वेगवेगळ्या माध्यमांतून पुढे आला. मात्र, पुण्यात आता रात्री-अपरात्री मुली बिनधास्त रस्त्यांवर फिरताना दिसतात. मला वाटतं, हे समाजाच्या परिपक्वतेचं लक्षण आहे.’’

चूल अन्‌ मूल

मोनाली मॅडमचं हे छोटेखानी भाषण ऐकून ४३ वर्षांच्या सायली इचले यांनाही आपलं मत मांडण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या बोलू लागल्या, ‘‘आमच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. आता मुलांना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार वाटतो. परंतु स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे कसंही वागणं नव्हे, याची जाणीव मी माझ्या मुलांना करून देत आहे. मुलांचं शिक्षण, त्यांचे विचार याबाबतीत जरूर स्वातंत्र्य असायला हवं, पण ती जिथं चुकतील तिथं पालकांचं मार्गदर्शनही गरजेचं आहे. आमच्या लहानपणी बाहेर मनसोक्त फिरण्यासाठी आम्हाला घरच्यांची परवानगी नसायची. मैत्रिणींसोबत जो काही वेळ घालवायचा असेल, तो घरीच घालवायचा, असा फतवाच असायचा. त्यामुळे मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत, हे घरात समजायचं, त्यांच्या घरचं वातावरणही लक्षात यायचं. सध्याचा काळ मात्र बदलला आहे. मुलांना आनंद साजरा करायचा असल्यास त्यांना पालकांसमोर सेलिब्रेशन करायला आवडत नाही. परंतु कधी-कधी त्यांच्याही कलाने घ्यावं लागतं. कारण मुलांना टीन एजमध्ये आई-वडिलांपेक्षा मित्र-मैत्रिणीच जवळचे वाटतात. त्यामुळे मुलांना वाढवताना काही वेळेस आपल्या पिढीचे नियम, तर काहीवेळेस बदलत्या काळानुसार वागावं लागणं, ही कसरत करावीच लागते. मी नववीत असताना माझ्या वडिलांनी मला पुण्यातील सगळ्या कॉलेजमधून फिरवलं होतं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की तू जर चांगले गुण मिळवलेस, तर तुलाही इथं शिक्षण घेता येईल. या त्यांच्या शिकवणुकीचं अनुकरण मी आज माझ्या मुलांच्या बाबतीत करीत आहे. त्यांनाही मी परिस्थितीची जाणीव करून देत स्वतःसाठी काय करायचं आणि आपलं भविष्य कसं आपल्याच हातात आहे, याची जाणीव करून देत आहे. परिस्थितीमुळे मला जास्त शिकता आलं नाही, पण माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं असं मला नेहमी वाटतं. त्यासाठी काही गोष्टी मला शिकाव्या लागल्या, तरी त्या शिकण्याचा मी प्रयत्न करत असते.

आमच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती होती, त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा असायचा. एकमेकांसोबत वाटून घेण्याची सवय होती. सध्याच्या मुलांमध्ये ती दिसून येत नाही. ती मी माझ्या मुलांमध्ये रुजवते आहे. आम्हाला आजी-आजोबा, काका-काकूचं प्रेम मिळालं, ते आता सर्वांना मिळत नाही, त्यामुळे काहीवेळेस मुलं एकलकोंडी होताना दिसतात. पण आत्ताची पिढी खूपच पुढारलेली आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न काही वेळेस अनुत्तरित करून जातात. ते सोडवण्यासाठी आणि त्यांना समर्पक उत्तरं देण्याचं कसब पालकांमध्ये असायला हवं.

मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही. मुलीला जसं समजावून सांगायचं, तसंच मुलालाही काही बाबी सांगाव्या लागतात. मुलांमध्ये नातेसंबंध रुजवणं गरजेचं झालं आहे. स्त्रियांबद्दलचा आदर मुलांना कुटुंबातूनच दिसला पाहिजे, तरच त्यांच्याकडून भविष्यात चांगल्या वर्तनाची खात्री बाळगता येऊ शकेल. वयात येणाऱ्या मुलांना सांभाळताना होत असलेली कसरत आव्हानात्मक आहे.’’  

वाट निवृत्तीची!

इतक्या साऱ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर आता आजीच्या मैत्रिणीही पुढे सरसावल्या. ६२ वर्षांच्या शैला परांजपे बोलू लागल्या, ‘‘संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, अगदी त्याच वर्षी १९६० मध्ये मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझा अर्थात तेंव्हाच्या विजया जोशींचा जन्म झाला. माहेरकडील शिक्षणाचा आग्रह आणि सासरकडच्या खंबीर पाठिंब्याने विजया जोशी ते बॅंकर शैला परांजपे हा माझा प्रवास यशस्वीपणे पार पडला. आता निवृत्तीनंतर व्यसनमुक्तीच्या कामात मी स्वतःला जोडून घेतलं आहे. समजूतदारपणा, स्वीकारार्हता, तारतम्य आणि नवं स्वीकारण्याची सहजता हीच आजवरच्या समाधानाची गुरुकिल्ली आहे. दूध डेअरीत काम करणारे वडील आणि घरकाम करणाऱ्या आईने शिक्षणाचा आग्रह कायम धरला. दोन भाऊ आणि दोन बहिणी असलेल्या आमच्या कुटुंबात मुलगा-मुलगी असा भेद नव्हताच मुळी. आता जरी मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर असलं, तरी तेव्हा आम्ही राहत असलेला भाग अगदी खेडेगावासारखा होता. डेअरीच्या मालकांचं शेत आणि डेअरीत काम करणाऱ्या कामगारांची मोजकीच घरं त्या टेकडीवर होती; पण सर्वच घरांमध्ये मुला-मुलींना मोकळं वातावरण होतं. एकमेकांशी जुळवून घेतलं की सुदृढ नातेसंबंध तयार होतात. शिक्षण झालंच पाहिजे हा आग्रह असला, तरी आम्ही फार करिअर मायंडेड नव्हतो. वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण झाल्यानंतर १९८० मध्येच युनियन बॅंकेत नोकरी मिळवली. पुढे १९८२ मध्ये पुण्यातील दिलीप परांजपे यांच्याशी लग्न झाल्यानंतर माझं नाव शैला परांजपे झालं. मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातील विजयाचा शैला परांजपेकडे होणारा प्रवास मात्र नक्कीच आव्हानात्मक होता. कारण परांजपे कुटुंबाची वैचारिक बैठक वेगळी होती, कौटुंबिक वातावरणातही बदल झाला होता. थोडासा समजूतदारपणा दाखविल्याने संबंध अधिक घट्ट होत गेले. पानशेतच्या पुरानंतर आमचं घर स्थलांतरित झालं. घरामध्ये सासूबाईंचा प्रभाव अधिक होता. परंतु, तो त्यांच्या आजवरच्या प्रवासातून आल्यामुळे मी नमतं घ्यायचे. सासरी मोकळेपणी संवाद कमी होता, तरीही मी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने मैत्रिणींशी संवाद जास्त होता. पुढे मुलं झाल्यावर सासूबाईंनी त्यांचा उत्तम सांभाळ केला. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठीही सासूबाईंचा खंबीर पाठिंबा होता, त्यामुळे माझा घर-मुलं आणि नोकरी असा प्रवास सुलभ झाला. एकत्र कुटुंबामुळे कामाची विभागणी होते, आमच्या घरातील पुरुषमंडळीही घरातील कामं करायची. सन २००० नंतर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत गेले. लॉकडाउनच्या काळात घरासाठी आवश्यक सर्व गोष्टी ऑनलाइन मागविल्या. संगणक आणि मोबाईलमुळे अधिक टेक्नोसॅव्ही होता आलं. मुलगा आणि मुलगी सोईला लागल्यानंतर मी स्वतःहून २०११ मध्ये निवृत्ती स्वीकारली. याच काळात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राशी असलेले संबंध अधिक घट्ट केले. माझ्या पतीला असलेल्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी मी या केंद्राच्या संपर्कात आले होते. पण पुढे याच व्यसनाधीनतेमुळे २००४ मध्ये त्यांचा ब्रेन हॅम्ब्रेज होऊन मृत्यू झाला. तरीही मी या केंद्राच्या संपर्कात असून, नवीन रुग्णांना मार्गदर्शन करण्याचं कार्य मी स्वयंप्रेरणेने करते.

एकत्र कुटुंबाचा नोकरी करणाऱ्या महिलेला नक्कीच फायदा होतो. थोडा समतोल साधला, समजूतदारपणा दाखविला, तर नोकरी करणाऱ्या महिलांनाही बरंच काही साध्य करणं शक्य होतं. आजकालच्या सासू या सुनांना नोकरी करण्यासाठी उत्तेजन देतात, ही खूप स्वागतार्ह बाब आहे. एखाद्या कुटुंबात अत्याचार होत असेल तर त्याविरुद्ध संघर्षही करावा; पण केवळ मतभेद आहेत म्हणून विभक्त होण्याची प्रक्रिया गंभीर असल्याचं मला वाटतं.’’

...आणि काय हवं?

परांजपे आजी थांबतात न थांबतात तोच ७० वर्षांच्या कमल पवार आजी उत्स्फूर्तपणे बोलू लागल्या. पुण्यातील नवी पेठेत जन्मलेल्या पवार आजी. शिक्षण तिसरीपर्यंत, पुढं शिकल्याच नाहीत, कारण अभ्यासाचा कंटाळा, असं त्या सांगत. त्या म्हणाल्या, ‘‘माझं वय किती हे नेमकं मला माहीत नाही. थोरली मुलगी आता ५३ वर्षांची आहे. लग्नानंतर एका वर्षाने, म्हणजे १७ व्या वर्षी झाली ती. आधी बरं होतं, लवकर लग्न व्हायचं. आजकालच्या पोरी तिशीनंतर लग्न करतात. त्या वयात स्वभाव पक्का झालेला असतो, तडजोड करायला जमत नाही, म्हणूनच मग वाद वाढतात. त्यामुळे लवकर लग्न झालेलंच बरं. काळ कुठलाही असू दे; नातं टिकवायचं असेल, तर त्यासाठी नमतं घ्यायला शिकलं पाहिजे. नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं, रुसवे-फुगवे तर चालूच असतात; पण आपण राग जास्त धरून ठेवायचा नाही. हाका मारायचं अन् परत बोलायला लागायचं. म्हणजे मग प्रेम टिकून राहतं. आजकाल एवढंसं काही झालं, की सगळे पार कोर्टापर्यंत जातात, अशानं कसं जमायचं आयुष्यात? आमचे मालक (नवरा) तसे कडक. भांडणही तसं रोजच व्हायचं; पण कधी टोकाला जायचे नाहीत. कारण त्यांनाही माझ्याशिवाय करमायचं नाही. घरी जेवणार असतील तर सगळ्यांसोबत मलाही जेवायला बसवत. काही खायला असेल, तर हातातील काम टाकून आधी खायचा आग्रह करत. मला बाहेर फिरायला, सिनेमालाही घेऊन जात असत. मुलींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. पोरी कुठं जातात त्यावर लक्ष ठेव कमल, असं ते दरडावून सांगायचे. मलाही तेच पटायचं. अजूनही जावयांसमोर असताना मी डोक्यावर पदर घेते. आजकालच्या मुली मात्र बिनधास्त बाहेर पडतात, स्वतंत्र असतात. त्यालाही काही हरकत नाही, कारण काळच तसा आला आहे; पण मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. मुलं आजकाल करतात स्वयंपाक वगैरे; पण त्यांनी रोजच ते केलेलं मला काही आवडत नाही. मुलींनी नोकरी वगैरे करावी, पण घरातली कामं करून. घरातला कुठलाच निर्णय नवऱ्याला न विचारता घ्यायचा नाही. आपलं म्हणणं त्यांना पटलं तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं, असं आमचं तत्त्व.

माझं लग्न सोळाव्या वर्षी झालं असावं. १७५ रुपये नवऱ्याला पोशाखाला देऊन माझं लग्न ठरलं. माझ्या वडिलांच्या मित्राच्या दुकानात कामाला असलेला माणूस सहज घरी येऊन पाहून गेला. मी आपली ब्लाऊज-परकर घालून चहा पीत बसलेले. मी कशाला तोंडाची बशी काढतेय; पण नंतर कळलं की ते मला पाहायला आले होते. त्यांनी मला पसंत केलं; पण २५ रुपयांमुळे माझं लग्न मोडत होतं. कारण त्यांनी २०० रुपये मागितले होते. माझ्या वडिलांनी एवढे पैसे देणं शक्य नसल्याचं सांगितलं. शेवटी १७५ रुपयांत लग्न ठरलं.

लग्न ठरवताना वडिलांनी मुलगा चांगला पाहिजे, असं सांगितलं होतं. आम्हीही आमच्या पोरींची लग्नं लावताना तेच केलं. लग्न करताना व्यवस्थित करू, चौकशी करून लग्न लावून देऊ; पण नंतर तक्रारी घेऊन माहेरी यायचं नाही, असाच नियम असायचा. पुढे यजमानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर घरीच मेस सुरू केली. त्यातून स्वतःचे असे थोडे पैसे मिळायला लागले. आजही पोरं आमच्या मेसमध्ये नियमित जेवून जातात. ७० वर्षांच्या वयात आजही मी उत्साहाने त्यांना गरम गरम पोळ्या करून वाढते. कोरोनाकाळात मात्र हाल झाले. सगळी गुंतवणूक मोडावी लागली. पुन्हा मेस सुरू झाल्यावर आता परिस्थिती थोडी बरी आहे, पण महागाई खूप वाढली आहे. मेट्रो वगैरे सुरू करण्यापेक्षा आधी महागाई कमी करायला हवी असं मला वाटतं. मुलगा-मुलगी भेद नसावा, हे मान्य आहे; पण मुली झाल्या तरी मुलगाही असलेला बरा, असं मला वाटतं.’’ आज माणसं माणसापासून दूर झाली आहेत. आधी सगळं सुरक्षित होतं. पुरुषही कधी वाकड्या नजरेनं बघत नसत, त्यामुळे पोरीबाळी उशिराने बाहेर पडल्या तरी भीती वाटत नसे. आता मात्र रात्रीच्या वेळी त्यांना बाहेर पाठवायला नको वाटतं, त्यामुळे पूर्वीचाच काळ बरा होता, असं मला वाटतं, असं म्हणत कमल पवार आजी थांबल्या आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अशा हृदयस्पर्शी मनोगतांनी सर्वांच्या सहप्रवासाचा महिला दिन साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com