लोणी काळभोर येथे योगाभ्यासकांची प्रात्यक्षिके

जनार्दन दांडगे
गुरुवार, 21 जून 2018

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पूर्व हवेलीमधील जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालये व विविध सामाजिक संस्थांमध्ये गुरुवारी (ता. 21) सकाळी योगाभ्यासकांनी योगासनांच्या विविध आसनांची प्रात्यक्षिके करून योगाचे महत्व पटवून दिले.
 

लोणी काळभोर - लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील योगा हॉलमध्ये झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी - एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश देशपांडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांडे, महाराष्ट्र नेव्हल एज्युकेशन ट्रेनिंगचे प्रिन्सिपल सुबोध देवगावकर, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रमुख डॉ. असावरी भावे, एमआयटी विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, एमआयटी स्कूल ऑफ हॉल्सिटीकच्या प्रमुख चारुलता लोंढे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. डॉ. सुश्रुथा, डॉ. आनंद गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.

शिबिराचे सूत्रसंचालन प्रा. समाधान निकूम यांनी केले. लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळा लाडबापडळ येथे सरपंच वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळभोर, रेखा काळभोर, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष चंद्रकांत दुंडे, दत्तात्रेय काळभोर विद्यार्थ्यांसह सामुदायिक सूर्यनमस्कार, पद्मासन व योगाचे विविध आसनांचे प्रात्यक्षिक केले. तसेच सामुदायिक योग गीत, योग प्रार्थना व श्लोकाने योग प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार ग्रामसुधार ट्रस्टच्या निसर्गोपचार आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत डॉ. अभिषेक देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक भगवती मुखेडकर व तुषार जगदाळे यांनी योग प्रात्याक्षिके सादर केली. यावेळी आश्रमातील रुग्ण, स्थानिक ग्रामस्थ, कर्मचारी अशा सुमारे दिडशे जणांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी नॅचरोपॅथी डॉ. प्रशांत शहा यांनी योगाचे महत्त्व व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक समतोल आहाराबद्दल माहिती दिली. थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगासनांच्या इतर आसनांची प्रात्याक्षिके करून घेतली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षकांनी सहभाग घेतला होता.

सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयामध्ये योग शिक्षक व्ही. के. ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रकारांची माहिती देवून प्रात्याक्षिके करून घेतली. यावेळी पुरोगामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे, सचिव रंगनाथ कड, संस्थेचे विश्वस्त व विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. एस. मोनीन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगा प्रकार सादर करून कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. पानगे यांनी केले. नायगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे महात्मा फुले कृषि महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थी व उपशिक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले. दरम्यान राज्य स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामभाऊ सातपुते यांनी शाळेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करून शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा केली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांसह उपसरपंच राजेंद्र चौधरी, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष शांताराम उरसळ, नितीन चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, शिक्षकांनी योगासने सादर केली. यावेळी सुमारे अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Yoga Day At Loni Kalbhor