मांजरी-हडपसर परिसरात योगदिन उत्साहात   

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 21 जून 2018

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

मांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मांजरी बु्द्रुक येथील अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने के. के. घुले विद्यालयात आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना योग प्रशिक्षक कवडे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी शिबिराचे संयोजन केले. सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमीत घुले, पोलिस पाटील अमोल भोसले, मुख्याध्यापक भास्कर गोसावी, ग्रामसेवक अनील कुंभार, बाळासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते. 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संदीप शिंदे यांनी योगाबद्दलची माहिती देवून योगाची प्रात्यक्षिके घेतली. प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांनी ध्यानधारणासह राजयोगासंबंधी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

मांजरी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ईशा फाउंडेशनच्या हेमा शर्मा यांनी योग प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभाग यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रम अधिकारी प्रा. केतन डुंबरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विवेक भोसले व प्रा.विकास हिरुळकर यांनी संयोजन केले.

फुरसुंगी गंगानगर येथील प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक व रमणलाल शहा माध्यामिक विद्यालयात योग दिनानिमित्त साई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. प्रशिक्षक मधुसूदन नडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. धर्मा सोनवणे यांनी व्यसनमुक्तीपर व्याख्यानं दिले.  मुख्याध्यापिका कविता बडेकर, सुवर्णा ससाणे, वैशाली नाईक यांनी संयोजन केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International yoga day at manjari pune