पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात इंटरनेटची वानवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

आयुक्तालयात बीएसएनएलकडून इंटरनेट सुविधा पुरविली जात असून, सध्या ती व्यवस्थित सुरू आहे. दुरुस्तीच्या कामावेळी किंवा कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यास इंटरनेट बंद पडते. दरम्यान, इंटरनेट बंद पडल्याने कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी सर्व विभागांना डोंगल दिलेले आहेत. त्याद्वारे इंटरनेट वापरून कामकाज केले जाते. कामावर परिणाम होत नाही.  
- शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक, बिनतारी संदेश विभाग

पिंपरी - पोलिस आयुक्तालयातील इंटरनेट सुविधा वारंवार बंद पडत असल्याने कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे तातडीने माहिती देण्यासाठी वरिष्ठांनी दिलेला आदेश आणि दुसरीकडे बंद इंटरनेट, यामुळे कर्मचारी कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे स्वत:च्या मोबाईलवरील ‘हॉटस्पॉट’द्वारे इंटरनेट जोडून कामकाज करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोठ्या थाटामाटात १५ ऑगस्ट २०१८ ला शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात आले. मात्र, तब्बल दीड वर्ष उलटल्यानंतरही पायाभूत सुविधांसाठी कर्मचाऱ्यांना झगडावे लागत आहे. डिजिटलच्या जमान्यात क्षणाक्षणाला इंटरनेटची आवश्‍यकता भासते. निम्म्यापेक्षा अधिक काम इंटरनेटवर अवलंबून असून, ते बंद पडल्यास सर्व कामकाजच ठप्प झाल्याची स्थिती सध्या पोलिस आयुक्तालयात पाहायला मिळत आहे.

वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना एखाद्या बाबीची तातडीने माहिती मागवून सादर करायला सांगितले जाते. मात्र, ही माहिती मिळविण्यासाठी संगणकाला इंटरनेटच उपलब्ध नसल्याने काम करणार कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी स्वत:च्या मोबाईलवरील हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट सुरू करून कामकाज करीत आहेत. मात्र, हा भुर्दंड आम्ही का आणि किती दिवस सहन करायचा, असा प्रश्‍न आयुक्तालयातील एक कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: internet problem in Police Commissioner pimpri chinchwad