हिंदू चूप बसतील असा विचार करू नका: सुब्रह्मण्यम स्वामी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

असहिष्णुतेच्या नावावर भाजपविषयी आज जो अपप्रचार होत आहे, तो अयोग्य आहे. कॉंग्रेस पक्षाने आणीबाणीच्या काळात जे केलं, ते पाहता आज असहिष्णुतेविषयी बोलण्याचा त्यांचा अधिकार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकांपासून कॉंग्रेस हरतच चालली आहे.

पुणे : "सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह चिदंबरम आणि शशी थरूर हे लवकरच तुरुंगात जातील' आणि "येत्या 2030 पर्यंत देशात भाजपचीच एकहाती सत्ता असेल' अशा स्वरूपाची "भाकिते' करत आणि देशभरातील लोकांना जमावाने मारून टाकणारे "गोरक्षक' मुळात भाजपचे कार्यकर्ते नाहीतच, अशी भाजपची बाजू सुरक्षित करू पाहणारी काही विधाने भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली. शिवाय, इतिहासातील अनेक गोष्टींचे संदर्भ देत कॉंग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर एकीकडे स्वैरपणे टीका करतानाच त्यांनी "राम मंदिर होणारच' असेही उच्चरवात म्हटले. 

विवेक समूह आणि भारत विकास परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रविवारी "असहिष्णुता- सत्य की आभास' या विषयावर स्वामी बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, प्रदीप रावत, दत्तात्रेय चितळे, दिलीप करंबळेकर आदी उपस्थित होते. आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही या वेळी करण्यात आला. 

स्वामी म्हणाले, "असहिष्णुतेच्या नावावर भाजपविषयी आज जो अपप्रचार होत आहे, तो अयोग्य आहे. कॉंग्रेस पक्षाने आणीबाणीच्या काळात जे केलं, ते पाहता आज असहिष्णुतेविषयी बोलण्याचा त्यांचा अधिकार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकांपासून कॉंग्रेस हरतच चालली आहे. त्यामुळेच "बुडत्याला काठीचा आधार' म्हणून त्यांनी आता असहिष्णुतेचा मुद्दा उचलला आहे. हे म्हणजे "सौ चुहे खाकर, बिल्ली चली हज को' असंच आहे. आणीबाणी लादणाऱ्या लोकांनी आम्हाला असहिष्णुतेबद्दल प्रश्न विचारू नये!'' 

पुन्हा मंदिर वही बनाएंगे 
असहिष्णुतेबद्दलचे "सत्य' मांडू पाहणाऱ्या या कार्यक्रमात पतित पावन संघटनेकडून स्वामी यांना भेट म्हणून तलवार देण्यात आली. या वेळी या संघटनेच्या समर्थकांनी मोठ्या आवाजात "मंदिर वही बनाएंगे' ही घोषणाही दिली, तर राममंदिराचा निर्णय दिवाळीपर्यंत होणारच असल्याची घोषणा स्वामींनी केली. शिवाय, "हिंदू चूप बसतील असा विचार करू नका, हिंदू लढतील' असे त्यांनी विधान केले. आम्ही कलम 370 हटवणार आणि समान नागरी कायदा आणणार, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intolerance debate raised by Congress a non-issue: Subramanian Swamy